भंडारा घटनेच्या चौकशीचे आदेश; वाचलेल्या बालकांवर उपचार

मृतदेह नातेवाईकांना हस्तांतरित; जखमी बालकांसाठी स्वतंत्र उपचाराची व्यवस्था

भंडारा दि. 9 :  भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटला रात्री उशिरा  आग लागल्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळावर तैनात आहे. या अपघातात बळी पडलेल्या बालकांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आले. तर अन्य बालकांना सुरक्षित बाहेर काढून या प्रत्येक बालकावर  उपचारासाठी स्वतंत्र पथक देण्यात आले आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू वॉर्डमध्ये मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागली. शॉट सर्किटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे. रात्री ड्युटीवर असलेल्या नर्स व वॉर्डबॉय यांनी तातडीने खिडक्या, दरवाजे उघडले. या कक्षालगतच्या दुसऱ्या वॉर्डमधील बालकांना त्यांनी तातडीने हलविल्याने 7 बालकांना वाचविण्यात यश आले. या दुर्घटनेत 10 बालकांचा मृत्यू झाला असून त्यातील तिघांचा आगीत होरपळून तर अन्य सात बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेसह पोलीस व प्रशासनाने तत्परतेने प्रतिसाद दिल्याने अधिकची जीवितहानी टळली. इतर वार्डातील रुग्णांच्या जीवास धोका पोहोचणार नाही. यासाठी प्रशासनाने जीवाची बाजी लावून या प्रसंगी काम केले.  दगावलेल्या बालकांचे मृतदेह आज सकाळी कुटुंबांच्या स्वाधीन करण्यात आले. पीडित कुटुंबासोबत एक पथक जिल्हा प्रशासनाने सोबत दिलेले आहे. तर या दुर्घटनेतून बचावलेल्या बालकांच्या उपचारात कोणतीही हेळसांड होऊ नये, यासाठी प्रत्येक बालकासोबत एक नर्स व डॉक्टरांचे पथक देण्यात आले आहे. या सर्व बालकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री  विजय वडेट्टीवार घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी आवश्यक उपाययोजना करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. ते स्वतः या ठिकाणी थांबून असून संपूर्ण कार्यवाहीचा आढावा घेत आहेत. तसेच दुपारी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली  संपूर्ण यंत्रणा रात्री उशिरापासून कार्यरत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल अतीव दुःख व्यक्त केले आहे. अशा कठीण प्रसंगी संपूर्ण प्रशासन दुर्दैवी कुटुंबांच्या पाठीशी असून प्रत्येक बालकाच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे. ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून  या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री स्वत: जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संपर्कात असून या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती  वेळोवेळी घेत आहेत. या घटनेची सखोल चौकशी करतानाच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. आगीच्या कारणांचा शोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे आरोग्‍यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.