अमेरिका, महाराष्ट्राच्या सदृढ संबंधातून उज्ज्वल भविष्य घडेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अमेरिकन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम

मुंबई,३ ऑगस्ट /प्रतिनिधी :- ‘अमेरिका आणि महाराष्ट्राचे सौहार्द, सदृढ संबंध उज्ज्वल भविष्य घडविण्यात महत्त्वपूर्ण ठरतील,’ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

अमेरिकच्या २४७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमेरिकन वकिलात व वाणिज्य दूतावास यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

कार्यक्रमास अमेरिकेचे भारतातील राजदूत एरीक गार्सेटी, दूतावास प्रमुख माईक हॅन्की, पद्मश्री श्रीमती रीमा नानावटी, राज्याच्या मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर – पाटणकर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी याप्रसंगी उपस्थित अमेरिकन वकिलात, वाणिज्य दूतावासाशी निगडित वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी, नागरिक तसेच मान्यवरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, अमेरिकेचा स्वातंत्र्य लढा आणि लोकशाहीच्या बळकटीकरणातील योगदान उल्लेखनीय आहे. भारत आणि अमेरिकेतील मैत्री दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी अलिकडेच अमेरिकेच्या केलेल्या दौऱ्यात या मैत्रीच्या नात्याचे प्रतिबिंब पडले. यामुळे दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध आणखी वृद्धिंगत होतील. या माध्यमातून भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश जगातील आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जातील,असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, अमेरिकेतील गुंतवणूकदारांना महाराष्ट्र राज्यात गुंतवणुकीच्या उत्तम संधी उपलब्ध आहे. राज्यात कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सोयीसुविधांचा विकास गतीने होत आहे. राज्यात महिला सक्षमीकरण, तरुणांमधील कौशल्य विकास, मुलींच्या जन्माचे स्वागतासाठी ‘लेक लाडकी’ योजनेतून अनुदान देण्यात येत आहे. स्त्री- पुरुष समानतेवर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.