राज्यात कोरोनाचे १६४२९ नवे रुग्ण; ४२३ जणांचा मृत्यू

मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यात १६,४२९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर उपचार सुरु असलेल्या ४२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९,२३,६४१ इतका झाला आहे. यापैकी २,३६,९३४ रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत राज्यातील २७०२७ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. 

आज दिवसभरात राज्यात कोरोनातून बरे झालेले १४,९२२ रुग्ण घरी परतले. त्यामुळे कोरोनावर यशस्वी मात केलेल्या लोकांचा राज्यातील आकडा ६,५९,३२२ इतका झाला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.३८ टक्के इतके झाले आहे. सध्याच्या घडीला राज्यात १५,१७,०६६ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर ३८,३४९ व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालय कोविड महामारीच्या प्रसारावर कृतीशीलपणे लक्ष ठेवून आहे आणि ज्या जिल्ह्यातील सक्रिय कोविड रूग्णांची संख्या  आणि मृत्यु दर वाढत आहे अशा सर्व संबंधित  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील अधिकाऱ्यांशी  प्रभावीपणे संवाद साधत असून त्यांना  या संकटाचे व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करत आहे.या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात, पुडूचेरी ,झारखंड आणि दिल्ली या राज्यांतील आरोग्य सचिवांशी  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन संवाद साधला आणि त्यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या 33 जिल्ह्यांतील प्रतिबंधात्मक  योजना आणि कोविड व्यवस्थापनाचा आढावा घेतला. यात महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगरे,कोल्हापूर, सांगली,नाशिक, अहमदनगर ,रायगड, जळगाव, सोलापूर, सातारा, पालघर, औरंगाबाद, धुळे आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

महाष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या सात दिवसांत 126,523 रुग्ण आणि 2,205 मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सध्या एकूण 235,857 सक्रीय रुग्ण आहेत, ही संख्या देशातील रुग्णांच्या एक-चतुर्थांश एवढी आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकार टेलि-आयसीयु प्रकल्पाचा विस्तार करण्यासंदर्भात विचार करत आहे. टेलि-आयसीयू सेटअपमध्ये एक क्रिटीकल केअर टीम असते जी ग्रामीण भागातील रूग्णांवर उपचार करणार्‍या आणि दुर्गम भागातील रुग्णालयांना मार्गदर्शन करण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान आणि दळणवळण साधनांचा वापर करते. या माध्यमातून राज्यातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या कमतरतेची पूर्तता करणे, गंभीर आजारी रूग्णांना उपचार उपलब्ध करून देणे आणि मृत्यु दर कमी करणे अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *