कामगार नेते डॉ. दत्ता सामंत हत्या प्रकरणी छोटा राजनची निर्दोष सुटका

मुंबई : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांच्या हत्ये प्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी गँगस्टर छोटा राजन याची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.

पोलिसात दाखल असलेल्या तक्रारींनुसार, १६ जानेवारी १९९७ रोजी डॉ. सामंत हे पवईहून घाटकोपर येथील पंतनगरकडे जात होते. यादरम्यान पद्मावती रोडवरील नरेश जनरल स्टोअरजवळ त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात डॉ. सामंत यांना आपले प्राण गमवावे लागले. या प्रकरणातील पहिल्या टप्प्यात काही स्थानिक आरोपींवर खटला चालवण्यात आला. त्यातील काहींना शिक्षा सुनावण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात छोटा राजनसह गँगस्टर गुरू साटम आणि राजनचा विश्वासू रोहित वर्मा हे फरार असल्याचे दाखवून त्यांचा खटला बाजूला ठेवण्यात आला होता.

राजनने हत्येचा कट रचल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला होता. डॉ. सामंत यांच्या हत्येसाठी त्याने कट रचला हे सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे नसल्याचे न्यायालयाने म्हटले. या खटल्यातून छोटा राजनची निर्दोष मुक्तता झाली असली तरी वेगवेगळ्या शहरांमध्ये डझनभर खटले सुरू असल्याने त्याची तुरुंगातून लवकर सुटका होण्याची शक्यता नाही.

या खटल्याच्या सुनावणीत महत्त्वाच्या साक्षीदारांनी साक्ष फिरवली. आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यासाठी इतर साक्षीदारांची साक्ष पुरेशी नसल्याचे कोर्टाने म्हटले.

ऑगस्ट २०२१ मध्ये हत्येचा खटला सुरू झाला. तपासादरम्यान या प्रकरणात कोणताही नवीन पुरावा समोर आलेला नाही, असे सीबीआयने सांगितले होते. खटल्यादरम्यान अनेक साक्षीदार तपासण्यात आले. यात दत्ता सामंत यांचा मुलगा भूषण यांचाही समावेश होता, ज्याने हल्ल्यानंतर वडिलांना रुग्णालयात आणले तेव्हाची साक्ष दिली. या खटल्यात एकूण २२ साक्षीदार तपासण्यात आले, त्यापैकी आठ साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली.

डॉ. दत्ता सामंत हे मुंबईतील कामगारांचे प्रभावी आणि मोठे नेते मानले जात होते. त्यांच्या नेतृत्वात १९८२ मध्ये मुंबईतील कापड गिरणी कामगारांनी अभूतपूर्व संप पुकारला होता.