भिडेंच्या अडचणी वाढणार? पृथ्वीराज चव्हाण यांनी केली अटकेची मागणी

मुंबई,२८ जुलै /प्रतिनिधी :-मनोहर उर्फ संभाजी भिडे हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. ते म्हणाले की, “महात्मा गांधींचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे त्यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार ते त्यांचे खरे वडील आहेत.” असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन आज (२८) जुलै रोजी विधान परिषदेत विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली.

संभाजी भिडे नावाच्या गृहस्थाने महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या व्यक्तीला कलम १५३ अंतर्गत अटक केली पाहीजे. ते अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राष्ट्रपित्याबद्दल विधान केल्यानंतर हा माणूस बाहेर कसा फिरु शकतो. यानंतर काही प्रतिक्रिया उमटल्या तर याला जबाबदार कोन असेल? त्यामुळे या व्यक्तीला कलम १५३ अंतर्गत अटक केली पाहीजे, अशी मागणी चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीची नोंद घेऊन सरकारने याप्रकरणी उचित कारवाई करावी. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत नोंद घेतली असल्याचं सांगत चौकशी करुन योग्य ती कारवाई करु, असं आश्वासन दिलं.

“भिडेंची जागा कारागृहात, समाजप्रबोधन करण्याची त्यांची पात्रता नाही”, यशोमती ठाकूर संतापल्या

संभाजी भिडे हे नेहमी वाटेल ते बोलतात. इतिहासाची तोडफोड करून तेड निर्माण करत आले आहेत. युवकांची माथी भडकवून अराजकता निर्माण करतात. मात्र सरकार याच्यावर कोणतीच कारवाई करत नाही. त्यांना पूर्णपणे मुभा देते. संभाजी भिडेंचे बोलविता धनी कोण? आणि त्यांना अभय कुणाचे? असा प्रश्न आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

संभाजी भिडेने आजवर अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. पण त्यांच्यावर कधीच कोणती कारवाई होत नाही. संभाजी भिडे नावाचे महाशय शिवप्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी अमरावतीला आले होते. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली. इतकेच नव्हे तर भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्‍तव्‍य सुद्धा केलं. संभाजी भिडे नावाचे हे गृहस्थ कायम वादग्रस्त बोलून समाजात विष कालविण्याचे काम करत आले आहेत. युवकांची माथी भडकवितात, तरीही राज्याचे गृहमंत्री त्यांच्यावर कोणतीच कारवाई करीत नाही, याचा अर्थ काय? असा प्रश्न आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. त्या पुढे म्हणाल्या की, यापुढे जर संभाजी भिडे यांनी असं वक्तव्य केलं तर त्यांना त्याच भाषेतच प्रत्‍युत्तर देण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल.

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, संभाजी भिडेंवर लवकरात लवकर कारवाई करावी. भिडेंची समाजप्रबोधन करण्याची पात्रता नाही आहे. भिडेंची जागा ही कारागृहात आहे. दंगली पेटविण्याच्या दृष्टीने वादग्रस्त वक्तव्य करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अवमान करणाऱ्या भिडेंवर कडक कारवाई झाली पाहिजे.

काय आहे प्रकरण?

शिवप्रतिष्ठानचे मनोहर उर्फ संभाजी भिडे हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतात. आता त्यांनी राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्यव्यामुळे ते चर्चेत आहेत. आपल्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. भिडे म्हणाले होते की, “महात्मा गांधी याचं नाव मोहनदास करमचंद गांधी असं सांगितलं जातं. पण करमचंद हे मोहनदास यांचे वडील नाही. गांधीजींचे खरे वडील हे मुस्लीम जमीनदार होते”, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर गाजला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील भीजडे यांना अटक करण्याची मागणी केली. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रकरणाची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिलं. भिडे यांनी केलेल्या विधानावरुन राजकीय वर्तुळातून बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.