महाबळेश्वरमध्ये ३८ मजुरांना घेऊन निघालेला टेम्पो दरीत कोसळला

सातारा : महाबळेश्वर येथे ३८ मजुरांना घेऊन निघालेल्या टेम्पोला शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. टेम्पोमध्ये लहान मुलांसह दोन गरोदर महिला असल्याची माहिती आहे. जखमींवर महाबळेश्वरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महाबळेश्वर तालुक्यातील मुकदेव गावानजीक तीव्र उतारावर बुलढाणा व अकोला भागातून कामासाठी ३८ मजुर घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आज सकाळी अपघात झाला. या अपघातातील जखमींना तळदेव येथे तर काहींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून दोन गंभीर जखमी लहान मुलांना सातारा येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सह्याद्री ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी जखमींना मदत केली.

महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर टेम्पो मजुरांना कामासाठी घेऊन जात असताना मुकदेव घाटात अवघड वळणावर टेम्पो दरीत कोसळला. टेम्पोमधून 38 प्रवासी कामावर जात होते. हे समजताच स्थानिक ग्रामस्थ आणि महाबळेश्वर प्रशासनाने बचावकार्य सुरू केले. सर्वांना बाहेर काढून महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व प्राथमिक उपचारानंतर सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. चार मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.