नाशिक बस दुर्घटनेत १३ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

नाशिक : नाशिक येथील नांदूर नाका येथे आज पहाटे खासगी बसचा अपघात झाला आणि त्यानंतर बसने पेट घेतल्यामुळे १३ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ३४ जण जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या पोहचायला उशीर झाल्याने काही प्रवाशी जागीच मृत्यूमुखी पडले. ही बस यवतमाळहून मुंबईकडे जात होती.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंतामणी ट्रॅव्हल्स या खासगी बसचा यवतमाळहून मुंबईकडे जात असताना नाशिक येथील नांदूर नाक्याजवळील मिरची हॉटेल येथे अपघात झाला. पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान हा अपघात घडला असून या बसचा कंटेनरशी झालेला अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर बसने लगेच पेट घेतला. बसमधील प्रवाशी झोपलेले असल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही आणि त्यामुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे.दुर्घटना झाल्यानंतर पोलिस अधिकारी आणि अग्निशामक दलाचे जवान सुमारे अर्धा ते पाऊण तासाने दाखल झाले होते. त्यानंतर जखमी झालेल्या ३४ जणांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.