नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राबवत असलेल्या उपक्रमांची केंद्रीय विद्यालयाकडून माहिती

छत्रपती संभाजीनगर,२७ जुलै /प्रतिनिधी :-नवीन शैक्षणिक धोरणाला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, छत्रपती संभाजीनगर येथील केंद्रीय विद्यालयाने आज (27 जुलै 2023) पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य अनिल यादव आणि  मुख्य प्रवक्ते यांनी या पत्रकार परिषदेत नवीन शैक्षणिक धोरणाची सविस्तर माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शायनिंग इंडिया, पीएम श्रीस्कूल, विद्याप्रवेश, बालवाटिका, विद्यांजली, निपुण भारत, पीएम ई-विद्या, आयटीईपी, निष्ठा, टॉय बेस्ड लर्निंग, मॅजिक बॉक्स आणि प्री व्होकेशनल अभ्यासक्रम यांसारखे विविध प्रभावी उपक्रम राबवण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

अनिल यादव यांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 आणि भारतातील शैक्षणिक परिदृश्य बदलण्याच्या दृष्टीकोनाबद्दल आपला उत्साह व्यक्त केला. नवीन शैक्षणिक धोरणाच्या सर्वसमावेशकता, लवचिकता आणि कौशल्य-आधारित शिक्षण या  मूलभूत तत्त्वांशी सांगड घालण्यासाठी केंद्रीय विद्यालय छत्रपती संभाजीनगर कॅन्टने घेतलेल्या प्रमुख पुढाकारांची रूपरेषा सांगितली आणि विद्यार्थ्यांमध्ये बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेच्या प्रयत्नांची माहिती अधोरेखित केली.

यावेळी झालेल्या चर्चेत सीबीएसई शाळेचे प्राचार्य सुधीर हाडके,रवींद्र राणा, सीमा गुप्ता, नवोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक पंकज देशमुख आणि राज्य सरकारी शाळेचे मुख्याध्यापक एन. सोनवणे, दीपक बनसोडे आणि  संतोष देशमुख, व्यवस्थापक, सीबीसी, श्रीकांत काळे, आयसीआयसीआय बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते