महाराष्ट्रात २ हजार तर छत्रपती संभाजीनगरात ९६ वीज कामगारांनी केले रक्तदान

थॅलॅसिमिया रुग्णांकरिता वीज कामगारांची ऊर्जा

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र वीज कामगार महासंघ नियमित विविध समजोपयोगी उपक्रम राबवत असतो. पूरपरिस्थिती असेल, दुष्काळ असेल, शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत असेल किंवा नुकतेच येऊन गेलेले कोरोनाचे संकट असेल, या सर्वच वेळी कामगार महासंघ देशासोबत सामाजिक उत्तरदायित्व म्हणून नेहमीच मदतीसाठी तत्पर असतो. याच राष्ट्रभावनेतून महासंघाचे स्वर्गीय श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी, श्रद्धेय बाळासाहेब साठ्ये, श्रद्धेय आण्णाजी आकोटकर यांच्या शिकवणीनुसार यांच्याच जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा मुख्यालयात महारक्तदान शिबिर आयोजिन केले होते. याद्वारे रक्तदानाबाबत जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करणे, नियमित रक्तदाते देशाला मिळावेत या सहज प्रक्रियेत सहभाग वाढून रक्तावाचून कुणीही रुग्ण दगावू नये हाच उदात्त हेतू महासंघाचा होता. या महारक्तदान शिबिरात महाराष्ट्रभर जवळपास 2 हजार रक्तदात्यानी सहभाग घेऊन रक्तदान केले.

दैनंदिन जीवनात अपघात, शस्त्रक्रिया यासाठी जशी रक्ताची गरज असते तसेच नियमित रक्त लागणाऱ्या रुग्णांची संख्याही खूप जास्त आहे. त्या प्रमाणात रक्तदान होत नाही. देशभरात प्रत्येक वर्षी हजारो मुलांना थॅलॅसिमिया (Thalassemia) हा आजार होतो. या आजारामुळे अनेक लहान मुले बळी पडतात. शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण झाल्यामुळे हा आजार अनेक मुलांना जडतो तसेच वेळेवर रक्त मिळाले नाही तर अनेकांचा मृत्यूदेखील या आजारामुळे होतो. जी मुलं या आजाराचा सामना करतात, त्यांचे जीवन सोपे नसते. त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते.

देशात प्रत्येक वर्षी असे 10 हजार नवीन घटना समोर येतात. यापेक्षा 3 पटीने जास्त रुग्ण सिकलसेल चे दिसून येतात. या रुग्णांना आयुष्यभर ब्लड ट्रान्सफ्यूजन आणि आयर्न चिलेनची आवश्यकता लागते. या दोन्ही रुग्णांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे एक मात्र उपचार आहे परंतु दुर्भाग्याची गोष्ट अशी की, फक्त 20 ते 25 टक्के रुग्णांना त्यांच्या परिवाराकडून एचएलए आयडेंकिल डोनर सहज उपलब्ध होतात. यामुळे रुग्णांचे ट्रान्सप्लांट होत नाही. ट्रान्सप्लांट न झाल्यामुळे रुग्णाला नियमित रक्ताची गरज भासते व रुग्णाला नेहमी शरीरात रक्त चढवावे लागते. या रुग्णांना जीवदान देण्यासाठी नियमित दर तीन ते चार महिन्यांनी रक्तदान करणे गरजेचे आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात या रुग्णांसाठी मोफत रक्त उपलब्ध करून देऊन उपचार करणारी भारतातील दुसरी तर महाराष्ट्रातील एकमेव व पहिली संस्था औरंगाबाद थॅलेसिमिया सोसायटीचे सत्य साई रक्त केंद्र ही काही वर्षापूर्वी सुरू झाली आहे. अतिशय समाजोपयोगी कार्य ही संस्था अडचणीचा सामना करत अविरत सेवा देत आहे. म्हणूनच भारतीय मजदुर संघाच्या वर्धापनदिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे  23 जुलै रोजी आयोजित रक्तदान शिबिरात संकलित 96 बॅग रक्त हे थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांसाठी महासंघाने उपलब्ध करून दिले.

महावितरण छत्रपती संभाजीनगर परिमंडळ येथे आयोजित रक्तदान शिबिरात 135 इच्छुकांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी थेलेसीमिया सोसायटीचे सत्यसाई रक्त केंद्र, संभाजीनगर यांनी 96 पात्र रक्तदात्याचे रक्त संकलित केले. सदर संकलित केलेले रक्त हे औरंगाबाद थेलेसीमिया सोसायटी यांना थेलेसीमियाग्रस्त असलेल्या रुग्णांना मोफत उपलब्ध करून देण्यात आले. जे रक्तदान करू शकले नाहीत त्या इच्छुकांचे समुपदेशन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घघाटन  श्री. मोहन काळोगे (अधीक्षक अभियंता,स्थापत्य) यांनी स्वतः रक्तदान करून केले. श्री अरुण पिवळ (महामंत्री),  श्री बापु शिंदे (प्रदेश कार्यालयमंत्री) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रभारी श्री बाबुराव  शिंदे, श्री दादाराव वाघमोडे (झोन अध्यक्ष), श्री वाल्मीक निकम (झोन सचिव), श्री संतोष सुरडकर, श्री सुहास निकम (झोन अध्यक्ष महापारेषण) यांची उपस्थिती होती. शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्वश्री अनिल नरोडे, गणेश दाभाडे, विजय मेटे, कैलास शेळके, पुंडलिक सपकाळ, अशोक कचकुरे, अर्शद खान, फराज शेख, दुर्गेश बनकर, अमर ठाकूर, शिवाजी फुलारे, संतोष शेंगुळे, निलेश पवार, योगेश राजपूत या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले तसेच सर्वच रक्तदात्यानी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.