कोविड घोटाळ्यात संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना ईडीने ठोकल्या बेड्या

डॉ. किशोर बिचुले यांनाही अटक… काय आहेत आरोप?

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या मुंबई महानगरपालिका कोविड घोटाळा प्रकरणाच्या कारवाईत ईडीने एक मोठे पाऊल उचलले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य नाव सुजित पाटकर तर दुसरे नाव डॉ. किशोर बिचुले यांचे आहे. या दोघांना अनेक आरोपांखाली अटक करण्यात आली असून आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे सुजित पाटकर हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचे निकटवर्तीय आहेत.

कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मुंबईत अनेक ठिकाणी जम्बो कोविड सेंटर्स उभारण्यात आले होते. त्यावेळी मुंबई महापालिकेकडून कोविड सेंटर्सचे कंत्राट पात्रता नसलेल्या लोकांना देण्यात आले होते. ‘लाईफलाईन’ या सुजित पाटकर यांच्या कंपनीला कंत्राट मिळाले होते. परंतु या कंत्राटादरम्यान, त्यांनी कागदपत्रांवर ज्या डॉक्टर्सची नावे व इतर गोष्टी नमूद केल्या होत्या त्या मुळात अस्तित्वातच नव्हत्या, असं ईडीच्या आरेपांमध्ये सिद्ध झालं आहे.

संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर नेमके कोण?

बीएमसी कोविड घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी आरोप केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं होतं. याप्रकरणी ईडीनं मुंबईत तब्बल १५ ठिकाणी छापेमारी केली होती. या आरोपांना संजय राऊत यांनी ते माझे फक्त मित्र असल्याचं म्हटलं होतं. ईडीच्या चौकशीत सुजीत पाटकरांच्या घरी अलिबागच्या जमिनीच्या व्यवहाराचे पेपर मिळाले होते. ज्या व्यवहारात पाटकरांची पत्नी आणि वर्षा राऊत यांची नावं होती. लाईफसायन्सेस हॉस्पिटल अँड मॅनेजमेंट या फर्ममध्ये मी भागीदारांपैकी एक आहे. परंतु कंपनी डॉ. हेमंत गुप्ता यांच्या मालकीची आहे आणि वरळी येथील त्यांच्या क्लिनिकच्या नावावर ती नोंदणीकृत आहे, असं सुजित पाटकर म्हणाले होते.

काय आहेत सुजित पाटकर यांच्यावरील आरोप?

यापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा केल्याचा मोठा गौप्यस्फोट करत व सुजित पाटकरांवर अनेक आरोप करत हे प्रकरण ईडीच्या लक्षात आणून दिलं होतं. संजय राऊत हे भागीदार असलेली लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस ही कंपनी अस्तित्वातच नाही. तरीही कोविड सेंटरचं कंत्राट या कंपनीला देऊन तब्बल शंभर कोटींचा जम्बो कोविड घेटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांनुसार, कोरोनाच्या लाटेत लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला १०० कोटींचं कंत्राट मिळालं होतं. या पैशातून ही कंपनी कोविड सेंटरला रुग्णसेवा पुरवणार होती. ५ जम्बो कोविड सेंटरसाठी १३ वेळा या कंपनीला कंत्राट मिळालं. मात्र कंपनीला कंत्राटं दिली तेव्हा ही कंपनी अस्तित्वात नव्हती. कंपनीला कुठल्याही प्रकारे रुग्णसेवा पुरवण्याचा अनुभव नव्हता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनीचं रजिस्ट्रेशनसुद्धा नव्हतं. २६ जून २०२० मध्ये कंपनी अस्तित्वात आल्याचं करारपत्रामध्ये समोर आलं.

करारपत्रानुसार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि सह्याद्री हॉटेलचे मालक राजीव साळुंखे हे या कंपनीचे भागीदार होते. या कंपनीला दहिसर, वरळी NSCI, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड आणि पुण्यातील कोविड सेंटरचे कंत्राट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. ऑगस्ट २०२० मध्ये पुण्यात तीन रुग्ण दगावल्यानंतर पुणे महापालिकेने या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं. पीएमआरडीएने (PMRDA) याच कंपनीला ९ सप्टेंबर २०२० ला ब्लॅकलिस्ट केलं. पुण्यात ब्लॅकलिस्टमध्ये असतानाही मुंबईत या कंपनीला ४ सेंटर्सची कामं देण्यात आली. या कोविड सेंटर्समध्ये अनेक कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून या कंपनीने शंभर कोटी रूपयांचा जम्बो कोविड घोटाळा केला आहे. या सर्व आरोपांखाली ईडीने केलेल्या चौकशीनुसार ईडीने सुजित पाटकर यांना अटक केली आहे.

एकीकडे कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे आता एसआयटी (SIT) देखील ॲक्शन मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कोरोना काळात भ्रष्टाचाराचा आरोप होत असताना यामध्ये एसआयटी चौकशीमध्ये आणखी कोणती माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.