पहिल्याच दिवशी कृषीमंत्री धनंजय मुंडे ॲक्शन मोडवर: शेतकऱ्यांच्या हितासाठी करणार कायदा

मुंबई: राज्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्यांविरोधातील अधिक कडक कायदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. चालू पावसाळी अधिवेशनातच अशा विक्रेत्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा कायदा अस्तित्वात आणला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होऊ नये या उद्देशाने राज्यात बोगस बियाणे, खते व कीटकनाशके विक्री करणाऱ्यांविरुद्ध आता अत्यंत कडक कायदा करण्यात येईल. बीटी-कॉटनच्या बाबतीत ज्या प्रमाणे बोगसगिरी करणाऱ्यांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करणारा कायदा अस्तित्वात आहे तसाच कायदा अन्य बियाणे, खते व कीटकनाशकांच्या बाबतीतही करण्यात यावा, असा निर्णय राज्य सरकारने घेतला असून हा कायदा येत्या अधिवेशनातच अस्तित्वात आणला जाईल.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी एक विशेष समितीही स्थापन करण्यात आली असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.