सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत आरव चावला, माया राजेश्वरन यांना दुहेरी मुकुट

मुंबई,  13 मार्च, 2021 :महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 15व्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात हरियाणाच्या आरव चावला याने, तर मुलींच्या गटात तामिळनाडूच्या माया राजेश्वरन यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.  
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉच्या अंतिम फेरीत मुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित हरियाणाच्या आरव चावलाने तिसऱ्या मानांकित दिल्लीच्या ओजस मेहलावट याचा 6-1, 6-2 असा सहज पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. काल दुहेरीत आरव चावलाने ओजस मेहलावटच्या साथीत विजेतेपद पटकावले होते.  
मुलींच्या गटात अंतिम फेरीत तामिळनाडूच्या दुसऱ्या मानांकित माया राजेश्वरन हिने तिसऱ्या मानांकित कर्नाटकाच्या हरिथाश्री वेंकटेशचा 6-1, 6-2 असा असा पराभव करून विजेतेपद मिळवले. तर काल दुहेरीत माया राजेश्वरन हिने  हरिथाश्री वेंकटेशच्या साथीत या गटाचे विजेतेपद पटकावले होते. 
स्पर्धेतील विजेत्यांना रमेश देसाई स्मृती करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी व स्पर्धा संचालक मनोज वैद्य, एआयटीए सुपरवायझर सोनल वैद्य आणि वैशाली शेकटकर यांच्या हस्ते करण्यात आले. 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम(मुख्य ड्रॉ)फेरी: मुले:आरव चावला(हरियाणा)(2) वि.वि.ओजस मेहलावट(दिल्ली)(3) 6-1, 6-2;  मुली:
माया राजेश्वरन(तामिळनाडू)(2)वि.वि.हरिथाश्री वेंकटेश(कर्नाटक)(3) 6-1, 6-2.