शरद पवार यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीत मतभेद असल्याचे समोर!

सातारा: अजित पवारांसह ९ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर रातोरात पक्षाकडून या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी प्रक्रिया सुरू झाली. त्यात प्रामुख्याने विधानसभा अध्यक्षांना पक्षाकडून पत्र देण्यात आले. या सर्व घडामोडीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या राष्ट्रवादीत दोन मत प्रवाह असल्याची चर्चा आहे.

शरद पवार सुरुवातीला म्हणाले की, आम्ही अपात्रतेच्या भानगडीत पडणार नाही. कुठली कारवाई करणार नाही. त्यानंतर पत्रकारांच्या पुढच्या प्रश्नाला उत्तर देताना पक्षाच्या विधिमंडळाचे सर्व अधिकार नेते म्हणून पहिल्यापासून जयंत पाटील यांच्याकडे आहेत. जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अपात्र करायचा की नाही हा अधिकार जयंत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आहे. जयंत पाटील हे पक्षाचे शिस्तबद्ध, कायदा जाणणारे नेते आहेत. त्यांनी अपात्रतेबाबत काही निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा निर्णय आहे, असे विधान केले. शरद पवारांच्या या दोन वेगवेगळ्या विधानामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय सुरु आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विरोधीपक्षनेते पद काँग्रेसला

यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसमधील विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसलाच मिळेल, यावर शिक्कामोर्तब केले. शरद पवार म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे विधानपरिषदेत काँग्रेसचे सर्वात जास्त आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी या पदावर दावा केला असेल तर ते रास्त आहे असं शरद पवार म्हणाले.

काँग्रेसला फटकारले!

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एकनाथ शिंदे यांना बाजूला करून अजित पवार यांना मुख्यमंत्री करणार असल्याच्या विधानाचा शरद पवार यांनी समाचार घेत, त्यांचा आमच्या पक्षाच्या बाबतीत बोलण्याचा काय संबध, असे विधान केले.