वैजापूर तालुक्यातील डवाळा शिवारात 5.2 हेक्टरमध्ये सुविधा केंद्र ; ‘समृध्दी’ वरील अपघात टाळण्यासाठी रस्ते विकास महामंडळाचा निर्णय

हॉटेल, स्वछतागृह, पेट्रोल पंप, आराममासाठी खोल्यांची सुविधा 

वैजापूर ,​९​ जुलै / प्रतिनिधी :-नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आता अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्गाच्या कडेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातील डवाळा शिवारात सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात समृध्दी महामार्गावरील राज्य रस्ते विकास महामंडळाच्या हद्दीत तीन सुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातील डवाळा शिवारात 5.2 हेक्टर क्षेत्रात हे केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे.

नागपूर – मुंबई समृध्दी महामार्ग खुला झाल्यापासून या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातात आतापर्यंत शंभरावर लोकांचा मृत्यू झाला आहे. या महामार्गावर थांबण्यासाठी व इतर कुठलीच सुविधा नसल्याने वाहन चालक व प्रवाशांना गैरसोय होऊन चालकाला डुलकी लागते. जुने वाहन, टायर चांगले नसणे, वाहनाचा वेग जास्त असणे आदी कारणे अपघाताची असली तरी बहुतांश अपघात वाहन चालकाला डुलकी लागल्यामुळे झाल्याचे सांगण्यात येते. म्हणून तातडीने समृध्दी महामार्गावर सुविधा केंद्रे उभारली जाणार आहेत.

वैजापूर तालुक्यात समृध्दी महामार्गावरील डवाळा शिवारात 5.2 हेक्टर क्षेत्रात हे सुविधा केंद्र उभारण्यात येणार असून या ठिकाणी हॉटेल, स्वच्छता गृह, पेट्रोल पंप, आरामासाठी खोल्या, वाशिंग सेंटर, कार – ट्रक या वाहनांसाठी सर्व्हिस सेंटर व पार्किंगची सोय आदी सुविधा  उपलब्ध करून देण्यात येणार आहे.