अजित पवार विरुद्ध शरद पवार:पक्ष आणि चिन्हांची लढाई निवडणूक आयोगात

अजित पवारांचा थेट अध्यक्षपदावर दावा! ३० जूनलाच केली होती ‘ही’ खेळी

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेण्यासाठी आधीच तयारी केल्याचे समजत आहे. अजित पवारांनी शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष असताना आपणच अध्यक्ष असल्याचे पत्र निवडणूक आयोगाला दिल्याचे समोर येत आहे.पक्ष आणि चिन्हच नाही तर थेट राष्ट्रीय अध्यक्षपदावरच अजित पवारांकडून दावा करण्यात आला आहे. निवडणूक आयोगात अजित पवार यांच्या गटाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे.  यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे.

अजित पवार यांनी ४० आमदारांच्या ठरावाची कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत. यामध्ये अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा ठराव करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे या पत्रावर ३० जून ही तारीख आहे. यावर निवडणूक आयोगाने आपण दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून त्यावर निर्णय देणार असल्याचे म्हटले आहे. आता हा निर्णय निवडणूक आयोगाकडे गेल्याने शरद पवारांना कायदेशीर लढाई लढावीच लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरून निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यासाठी कार्यकर्त्यांची शपथपत्रे, पुरावे आदी देण्यात आले होते. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले होते. यावर सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. सध्या दोन्ही गोष्टी शिंदे गटाकडे आहे.

दरम्यान, छगन भुजबळांनी देखील आपल्या भाषणात आम्हाला देखील कायदा कळतो, आम्ही सगळी तयारी करूनच हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे, त्यामुळे या तयारीचे त्यांनी एकाप्रकारे सूतोवाच केले होते. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने त्यांच्या समर्थनार्थ आमदार-खासदारांची ४० हून अधिक प्रतिज्ञापत्रे दाखल केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची गटबाजी निवडणूक आयोगाच्या दारापर्यंत पोहोचली आहे. शरद पवार कॅम्पने निवडणूक प्राधिकरणाकडे कॅव्हेट दाखल केले असून गटबाजीच्या संदर्भात कोणतेही निर्देश देण्यापूर्वी प्रथम त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.

४० आमदारांचे प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे

आम्ही सगळ्या आमदारांना व्हीप बजावला आहे. ४० पेक्षा जास्त आमदार आमच्या सोबत आहेत, असे अनिल पाटील म्हणाले. तर सरकारला कोणतेही बहुमत सिद्ध करायचे नाही त्यामुळे इथे आकडा महत्त्वाचा नाही. पक्षातील ९५ टक्के आमदारांचे समर्थन अजित पवारांसोबत आहे. आम्ही राष्ट्रवादी पक्ष आहोत, आमचा व्हिप सर्व आमदारांना लागू होतो. गरज पडल्यास आम्ही देखील न्यायलयीन लढाईला सामोरे जाऊ. तसेच 40 आमदारांचे प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे आल्याचा दावा अजित पवार गटातील एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे.

आता लढाई निवडणूक आयोगात

आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी पक्ष कुणाचा ही लढाई निवडणूक आयोगात होण्याची शक्यता आहे. पक्ष ठरवताना निवडणूक आयोग ट्रिपल टेस्टचा आधार घेते यात घटनेनुसार कोणता पक्ष धोरण राबवत आहे हे पहिले बघितलं जात, यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते कुणाच्या बाजूने आहेत हे बघितलं जातं, त्यानंतर लोकप्रतिनिधी कुठल्या बाजूने आहेत याचीही तपासणी केली जाते. शिवसेनेबद्दलचा निर्णय घेतानाही याच ट्रिपल टेस्टचा आधार घेण्यात आला होता. पक्षाच्या ध्येय धोरणांमध्ये शिवसेनेचे दोन्ही गट अपयशी ठरल्याचं निवडणूक आयोगाने सांगितले. तसंच दोन्ही गटांकडून आलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या सत्यतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, त्यामुळे अखेर लोकप्रतिनिधी कुणाच्या बाजूने आहेत, यावरून शिवसेना कुणाची हा निर्णय घेण्यात आला.

अजित पवार यांना पाठिंबा दिलेले आमदार  

शहापूर – दौलत दरोडा, राष्ट्रवादी

चिपळूण – शेखर निकम, राष्ट्रवादी

श्रीवर्धन – अदिती तटकरे, राष्ट्रवादी

आंबेगाव – दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी

इंदापूर – दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी

खेड-आळंदी – दिलीप मोहिते, राष्ट्रवादी

पिंपरी – अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी

बारामती – अजित पवार, राष्ट्रवादी

मावळ – सुनील शेळके, राष्ट्रवादी

वडगाव शेरी – सुनील टिंगरे, राष्ट्रवादी

हडपसर – चेतन तुपे, राष्ट्रवादी

कागल – हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी

चंदगड – राजेश नरसिंहराव पाटील, राष्ट्रवादी

फलटण – दीपक चव्हाण, राष्ट्रवादी

माढा – बबन शिंदे, राष्ट्रवादी

अहमदनगर शहर – संग्राम जगताप, राष्ट्रवादी

कळवण – नितीन पवार, राष्ट्रवादी;

दिंडोरी – नरहरी झिरवाल, राष्ट्रवादी

येवला – छगन भुजबळ, राष्ट्रवादी

अहेरी – धरमरावबाबा अत्राम, राष्ट्रवादी

अहमदपूर – बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी

उदगीर – संजय बनसोडे, राष्ट्रवादी

परळी – धनंजय मुंडे, राष्ट्रवादी

माजलगाव – प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी

अपक्ष आमदार देवेंद्र भुयार

शरद पवारांसोबत असलेले आमदार

इस्लामपूर – जयंत पाटील, राष्ट्रवादी

तासगांव-कवठे महांकाळ – सुमन पाटील, राष्ट्रवादी

शिराळा – मानसिंग नाईक, राष्ट्रवादी

कराड उत्तर – बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी

वाई – मकरंद जाधव-पाटील, राष्ट्रवादी

कर्जत-जामखेड – रोहित पवार, राष्ट्रवादी

कोपरगाव – आशुतोष काळे, राष्ट्रवादी

राहुरी विधानसभा – प्राजक्त तानपुरे, राष्ट्रवादी

सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी

काटोल – अनिल देशमुख, राष्ट्रवादी

बीड – संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी

घनसावंगी – राजेश टोपे, राष्ट्रवादी

अणुशक्ती नगर – नवाब मलिक, राष्ट्रवादी