मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, चिंता नको, २०२४ पर्यंत मीच मुख्यमंत्री

पण मंत्रीपदासाठी देव पाण्यात बुडवलेल्यांचे काय होणार?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेचे मंत्री, नेते, खासदार आणि आमदारांची बैठक रात्री उशीरा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना आश्वासन दिले की, राज्यात जे घडत आहे त्याची अजिबात चिंता करू नका. २०२४ पर्यंत मीच मुख्यमंत्री आहे. बाहेर सुरू असलेल्या चर्चांकडे दुर्लक्ष करा. आपले ५० पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्यासाठी जोरदार कामाला लागा, अशा सूचना त्यांनी आमदार, खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून शिंदे गटातील आमदार अस्वस्थ होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींचा दौरा अर्धवट सोडून नागपूरहून मुंबईत परतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराज आमदारांची बैठक घेतली. यावेळी शिंदे यांनी २०२४ पर्यंत मुख्यमंत्री बदलणार नाही. तुम्ही निश्चित राहा, असे आश्वासन आपल्या आमदार आणि खासदार यांना दिले. पण मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मौन पाळले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदार-खासदार यांची महत्त्वपूर्ण बैठक वर्षा निवासस्थानी घेतली. राष्ट्रवादीच्या आमदारांचा सरकारमध्ये समावेश झाल्याने शिंदे गटाचे आमदार नाराज झाले होते. ज्यांच्यामुळे शिवसेना सोडावी लागली आज त्यांच्या सोबतच बसावे लागत आहे, असे नाराज आमदारांचे म्हणणे होते. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे अजून खातेवाटप झालेले नाही. उद्या अजित पवार अर्थमंत्री झाले तर निधी वाटप कसे होईल? आमच्या मंत्रिपदाचे काय? असे प्रश्न आमदारांकडून एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले.

ठाकरे आणि पवार कुटुंबिय विरहित हे सरकार, आता जे झालंय ते पॅालिटिकल एडजस्टमेंट

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, अजितदादांची आपल्या युतीमध्ये एन्ट्री झाली असली तरी टेन्शन घेऊ नका, जे घडत आहे त्याची चिंता करू नका. ठाकरे आणि पवार कुटुंबिय विरहित हे सरकार आहे. मागच्या वेळी देखील अजित पवार आणि त्यांची टीम भाजपच्या मागे लागली होती. पण त्यावेळी त्यांना प्राधान्य न देता आपल्याला प्राधान्य दिले. आपली युती विचारांची होती, मात्र, आता जे झालंय ते पॅालिटिकल एडजस्टमेंट असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच हा निर्णय तुमच्या नेत्याला म्हणजे मला विश्वासात घेऊन घेतल्याचेही त्यांनी यावेळी उपस्थित आमदार-खासदारांना सांगितले.

माझ्या मनात प्रश्न होते ते मी थेट विचारले. तुमच्याही मनात काही प्रश्न असणं स्वाभाविक आहे. येत्या २०२४ ला ५० च्या ५० आमदार निवडणून येतील हे मी जाहिरपणे सांगतो. अडीच वर्षात झालेली कामं आणि आता एका वर्षात झालेली कामं यात फरक आहे ना? तुम्ही समाधानी आहात ना? असेही शिंदे म्हणाले.

आपल्या पक्षाबद्दल लोकप्रियता वाढत जात आहे. आपल्या जागा कशा वाढतील यावर काम करुया असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ही पाच आमदारांवर देण्यात येणार आहे. आमदारांची कामं झाली नाही तर त्यांनी मला येऊन भेटावं असेही मुख्यमंत्री म्हणाले. मी राजीनामा देणार राजीनामा देणार ही चर्चा सुरु आहे ती निरर्थक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. माध्यमांसमोर जास्त लोकांना बोलू नका, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिला आहे.

दरम्यान, या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष संघटना, राज्यातील गाव, वाडी वस्ती पातळीवर मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच शिवसेना पक्ष कार्यकारिणीने राज्यातील जिल्हा निहाय संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना एक शिवसेना मंत्री जोडून जनतेच्या विकासांची कामं वेगाने पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणार आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी शिवसेना संघटना बळकट करण्यासाठी आतापासूनच शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराचे काय होणार? यावर भाष्य करायचे एकनाथ शिंदे यांनी टाळले. त्यामुळे मंत्रीपदासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्या आमदारांचे काय होणार? या बैठकीतून शिंदे गटाच्या आमदारांचे कितपत समाधान झाले? हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत.