साप्ताहिक सराव चाचणी परीक्षेतून कॉपीमुक्ती अभियानात सक्रिय सहभाग

गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणपद्धती वृद्धिंगत व्हावी यासाठी शासनामार्फत कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले. यासाठी शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम शाळा-महाविद्यालयांत राबविले. याचाच भाग औरंगाबाद जिल्ह्यात शिक्षण विभागामार्फत साप्ताहिक सराव चाचणी परीक्षेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांच्या लिखाण कौशल्य व अध्यनक्षमता वाढीसाठी प्रयत्न केले. विद्यार्थी जेव्हा अभ्यासाच्या बाबतीत आत्मविश्वास गमावतो. स्वत: अभ्यासात कमी पडतो तेव्हा तो कॉपी करण्यासाठी प्रवृत्त होतो. यावर निदानात्मक उपाययोजना म्हणून साप्ताहिक सराव चाचणी परीक्षेचे आयेाजन जिल्ह्यतील शाळा महाविद्यालयात केले गेले. यातून विद्यार्थ्यांचा अभ्यास तर झालाच. पण यातून लिखाणाची गती वाढली व कॉपीमुक्त अभियानात प्रभावीपणे राबविले गेले.

मार्च 2020 पासून कोरोनासारख्या जागतिक संकटाला आपण सामोरे गेलो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात दूरस्थ  ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू करण्यात आली.

परीक्षा ही अंतर्गत मूल्यमापनावर आधारित झाली. मार्च 2021-22 या वर्षातील राज्य मंडळाची बोर्डाची परीक्षा शाळा तिथे केंद्र या धर्तीवर राबविली. परीक्षा कालावधी मध्ये वेळ देखील वाढवून दिला होता. मार्च 2021 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मार्च 2023 च्या बारावी परीक्षेत प्रविष्ट होणार होते. या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेचा व मूल्यमापनाचा अनुभव नाही. लिहिण्याचा सराव पुरेसा झालेला नाही, दुरस्थ शिक्षण असल्याने बऱ्याच संकल्पना स्पष्ट नव्हत्या, लिहिण्याची सवय मोडली आणि टायपिंग ची सवय लागली तीन तासाची प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी वेळ अपुरा पडतो. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास डगमगला, परीक्षेची भीती दूर व्हावी. या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे आहे हे लक्षात आले.

त्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील निवडक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या प्राचार्यांनी सहविचाराने उपाययोजना सुचविण्याचे ठरले. गटशिक्षणाधिकारी त्यांचे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्या मदतीने आणि सर्वसंमतीने इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी साप्ताहिक सराव चाचणी परीक्षा सबंध जिल्ह्यात आयोजित करण्याचे व या सराव परीक्षेतील मूल्यांकनानुसार विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षेतील अंतर्गत गुणदान परीक्षा मंडळाला सादर करण्याची योजना सर्व संमतीने आखण्यात आली. या योजनेला विभागीय शिक्षण मंडळानेदेखील ही साप्ताहिक सराव चाचणी परीक्षा अनिवार्य करण्याचे सुचविले.

यासाठी निवडक उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांचा एक गट स्थापन करण्यात आला या तज्ञ गटाने कला,वाणिज्य व विज्ञान शाखांसाठी इयत्ता बारावीच्या सर्व विषयाचे प्रश्नसंच तयार केले. सर्व तज्ज्ञाची विषयनिहाय समितीमार्फत तालुकानिहाय  सर्व उच्च माध्यमिक शाळा स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांची साप्ताहिक सराव चाचणी परीक्षेचे आयोजन आणि प्रश्नसंच वाटपाबाबत दिनांक 07/12/22 ते 22/12/2022 या काळात  कार्यशाळा घेऊन प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयास प्रश्नसंच वाटप करण्यात आले. या प्रश्नसंचाद्वारे साप्ताहिक सराव चाचणी परीक्षेचे स्वरूप 24/12/  2022 ते 30/12/2022 या कालावधित युनिट टेस्ट (ओपन बुक टेस्ट) घेण्यात आल्या जेणेकरून मुलांचा सराव झाला. नंतर  आठवड्यातून दोन वेळा सराव परीक्षा क्रमांक 1) दिनांक 7 डिसेंबर 2022 ते 22 डिसेंबर २०२२ सराव परीक्षा क्रमांक 2) दिनांक 4 जानेवारी 2023 ते 19 जानेवारी 2023 या नियोजित  वेळापत्रकाप्रमाणे साप्ताहिक सराव चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी व त्यांचे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांचे मदतीने महापालिका क्षेत्रात संबंधित समन्वयक विस्तार अधिकारी नियमित पडताळणी करीत होते.या परीक्षेत एकूण 59718 विद्यार्थ्यांपैकी 47688 विद्यार्थी या परीक्षेला उपस्थित होते.

अध्यापनासोबत या परीक्षेच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांचा लेखन सराव वाढला, बोर्ड परीक्षा विषयाची भीती दूर झाली, विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करणे सोपे झाले. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केल्याने आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या सरावाने विद्यार्थी लेखनात परिपूर्ण झाले. या साप्ताहिक सराव चाचणीमुळे इयत्ता बारावी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात संपन्न झाली.

मधुकर देशमुख

शिक्षणधिकारी (माध्यमिक)

जिल्हा परिषद, औरंगाबाद