एकीकडे आईचा आधार असलेली लेक तर दुसरीकडे तरुणाचं अख्खं कुटुंब…

भीषण अपघाताने एका रात्रीत केला स्वप्नांचा चुराडा

बुलढाणा : बुलढाण्यात समृध्दी महामार्गावर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Buldhana Bus Accident) झाल्याची घटना घडली. यामध्ये असलेल्या एकूण ३३ प्रवाशांपैकी २५ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे देशभरातून दुःख व्यक्त केले जात आहे. आगीत जळल्यामुळे मृतदेहांची ओळखही पटणेही कठीण जात होते. मात्र ओळख पटल्यानंतर मृत पावलेल्या व्यक्तींच्या हृदयद्रावक कहाण्या समोर येत आहेत. अनपेक्षितपणे झालेल्या या घटनेत अनेकांच्या स्वप्नांवर काळाने घाला घातला आहे.

बुलढाण्याच्या अपघातामुळे पुण्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघालेल्या अवंती पोहनेकर या २५ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. मूळची वर्ध्याची असलेली अवंती परिमल पोहनेकर इंजिनीअर असून पुण्यात करिअर करण्यासाठी पुण्याला विदर्भ ट्रॅव्हल्सने निघाली होती. तिला मेकअप आणि मॉडलिंगचा छंद होता. तिने ‘मेकअप आर्टिस्ट’ होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. हेच स्वप्न साकार करण्यासाठी तिच्या आईचा तिला पूर्ण पाठिंबा होता.

अवंतीचे वडील लहानपणीच गेल्याने तिच्या आईकडे जगण्यासाठी अवंती आणि तिची बहिण हेच कारण होतं. घरच्यांना सिंदखेड राजा येथून अवंतीच्या मृत्यूची माहिती मिळाली आणि तिने आणि तिच्या आईने पाहिलेलं स्वप्न एका रात्रीत भंगलं.

मुलाला कॉलेजला सोडून पुण्यात परतताना काळाचा घाला

बुलढाण्यातील बस दुर्घटनेनं पुण्यातील कैलास गंगावणे या शिक्षकाच्या कुटुंबावर घाला घातला आहे. पती-पत्नी आणि त्यांची कन्या असे तिघजण आपल्या मुलाला नागपूरला महाविद्यालयात सोडायला गेले होते. तिथंच मुलाला निरोप (Buldhana Accident ) दिल्यानंतर त्यांनी काढलेला अखेरचा फोटोही समोर आला आहे. फोटोत आई-वडील आणि मुलगा आहे, तर मुलीनं हा फोटो मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. या आनंदी क्षणानंतर घरी परतताना मात्र यात स्वतः कैलास गंगावणे, पत्नी कांचन गंगावणे आणि मुलगी सई गंगावणे हिचा मृत्यू झाला आहे.

कैलास गंगावणे पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील विद्यालयात गेल्या २५ वर्षांपासून इंग्लिश विषय शिकवत होते. तर सई गंगावणे ही अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. ती वैद्यकीय शिक्षण घेत होती. मात्र या तिघांशीही संपर्क होत नसल्याचे समजताच पत्नी कांचन गंगावणे यांचे बंधू अमर काळे यांनी शोध सुरू केला. त्यावेळी त्यांना या बसमधील लिस्टमध्ये आपले नातेवाईक असल्याचं कळलं आणि त्यांनी संपूर्ण माहिती घेतली. या दुर्घटनेमुळे काळे आणि गंगावणे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मृतदेहांची ओळख पटवणं अवघड

अपघात एवढा भीषण होता की, अपघातात दगावलेल्या प्रवाशांच्या मृतदेहांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवणंदेखील अवघड झालं आहे. त्यामुळे मृतदेहांची डीएनए टेस्ट करुन ओळख पटवावी लागणार आहे. सरकारी यंत्रणा सध्या बसमधील प्रवाशांची माहिती घेऊन त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचं काम करत आहे.