मराठवाडा वॉटर ​ ग्रीड माध्यमातून  वैजापूर व गंगापूर तालुक्यातील ३७७ गावांना शुध्द पाणी मिळणार – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.कराड 

वैजापूर ,२८ जून/ प्रतिनिधी :-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपाने कार्यकर्ते व पदाधिकारी यांना अकरा कलमी कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे शुक्रवारी (ता.30) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मराठवाडा वॉटर ​ ग्रीड या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाचे भुमीपूजन करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनी बुधवारी (ता.28) येथे पत्रकार परिषदेत दिली. 

डॉ.परदेशी यांच्या निवासस्थानी आयोजित या पत्रकार परिषदेला डॉ. राजीव डोंगरे, कैलास पवार, दिनेश राजपूत, प्रशांत कंगले, मोहन आहेर, प्रभाकर गुंजाळ यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. कराड यांनी, भाजपाने ३० मे ते ३० जुन या कालावधीत राबविलेल्या नऊ कार्यक्रमांची माहिती दिली. वैजापूर व गंगापूर तालुक्यातील ३७७ गावांना नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी केंद्र सरकारच्या जलशक्ती मिशन अंतर्गत मराठवाडा वॉटर ​ ग्रीड या सुमारे एक हजार ७५ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाद्वारे ग्रामीण भागातील जनतेला नळाचे पाणी पुरवण्यात येणार आहे. त्यासाठी जायकवाडी धरणाचे पाणी गंगापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणून वैजापूर तालुक्यातील १३२ किमी व गंगापूर तालुक्यातील १८२ किमी लांबीच्या पाईपलाईंनद्वारे प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्यात येणार आहे.‌ त्यासाठी तालुक्यात १५७ जलकुंभ बांधण्यात येणार आहेत.‌ डिसेंबर २०२४ पर्यंत हे काम पुर्ण करण्यात येईल. या योजनेसाठी सुमारे १०५ एमएलडी (दशलक्ष लिटर) पाण्यची आवश्यकता आहे असे ते म्हणाले. या कामाचे औपचारिक भुमीपूजन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गंगापूर येथे येत असून सकाळी अकरा वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. कराड यांनी यावेळी केले.‌