औरंगजेबाच्या समाधीस्थळी जावून भेट दिल्याने महाराष्ट्रात होणाऱ्या दंगली थांबवण्यात यश-प्रकाश आंबेडकर यांचा दावा 

नवी दिल्ली,२६ जून / प्रतिनिधी:- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खुलदाबाद येथे औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहिली होती. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांच्या या कृतीवर भाजपने टीका केली होती. यामुळे ठाकरे गट अडचणीत आल्याचं देखील बोललं जात होतं. छत्रपती घराण्याचे वंशज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज प्रकाश आंबेडकर यांना फटकारलं. छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रास देणाऱ्या आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खून करणाऱ्या व्यक्तीचं कौतूक कुणी कसं करु शकतो? असा सवाल त्यांनी केला आहे. तसंच प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करणार नसल्याचं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं.

आता प्रकाश आंबेडकर यांनी यामागचं खरं कारण सांगितलं आहे. त्यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत औरंगाजेबाच्या कबरीसमोर झुकल्याचं कारण सांगितलं आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी आपण औरंगजेबाच्या समाधीस्थळी जावून भेट दिल्याने महाराष्ट्रात होणाऱ्या दंगली थांबवण्यात आपल्याला यश आल्याचं म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या दाव्यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, संभाजीराजे संगमेश्वरला का गेले? यावर वाद आहेत. त्यांची माहिती औरंगजेबापर्यंत कशी पोहचली? जयचंद मुळे गेले असा इतिहास आहे. असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसंच औरंगजेबाने जो दंड दिला त्याची आम्ही निंदा करतो. गणोजी शिर्के, रामनाथ स्वामी यांनी संभाजीराजे संगमेश्वरला असल्याची माहिती पोहचवली असल्याचं ही ते म्हणाले.

औरंगजेबाचा जितका निषेध करतो तितका शिर्के, आबा भटजी यांचा देखील करायला हवा. हे वस्तूस्थितीला धरुन नाही. हिंदू, मुस्लीम, जैन, हिंदू हा वाद जो या देशात होतोय त्याबाबत जो इतिहास दिला जातो. तो बरोबर नाही. संभाजी राजे यांच्या हत्येत हिंदू देखील सहभागी होते, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.