आंदोलकांसह राहुल गांधीही पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आज दुसऱ्यांदा ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या आहेत. या चौकशी विरोधात काँग्रेसच्या वतीने राजधानी दिल्लीसह देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे. सोनिया गांधींच्या ईडी चौकशीला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढ़ी, केसी वेणुगोपाल, दीपेंद्र हुडा यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच विजय चौकात एकटेच आंदोलनाला बसलेल्या राहुल गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज ईडीकडून दुसऱ्यांदा चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी २१ जुलै रोजी, ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी सोनिया गांधी यांची जवळपास साडे तीन तास चौकशी केली होती. तर गेल्या महिन्यात जूनमध्ये राहुल गांधी यांची जवळपास ५० तास चौकशी करण्यात आली होती. त्यावेळीदेखील काँग्रेसने सलग ५ दिवस निदर्शने केली होती.