‘सारथी’च्या परदेश शिष्यवृत्तीची प्रकि‘या त्वरित सुरू करा

आ.सतीश चव्हाण यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर– छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजनेची प्रक्रिया त्वरित सुरू करावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आज (दि.23) निवेदनाव्दारे केली आहे.

आ.सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत मराठा समाजातील 50 गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. परदेशातील नामांकित विद्यापीठे व शिक्षण संस्थांचे शुल्क प्रचंड असल्याने सामान्य विद्यार्थ्यांना त्याठिकाणी शिक्षण घेणे परवडत नाही. आर्थिक परिस्थितीअभावी अनेक विद्यार्थी गुणवत्ता असूनही परदेशात शिक्षण घेऊ शकत नाहीत. याचा विचार करून सामाजिक न्याय विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीच्या धर्तीवर ‘सारथी’ अंतर्गत मराठा समाजातील 50 विद्यार्थ्यांना परदेशी पदव्युत्तर पदवी व पीएच.डी.चे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार ‘सारथी’ने प्रस्ताव तयार करून नोव्हेंबर 2022 शासनाकडे पाठवला. मात्र शासनस्तराव यासंदर्भात अद्यापही काहीच कार्यवाही झाली नसल्याने सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अभावी परदेशातील शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘क्यू एस’च्या जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या दोनशे मध्ये येणार्‍या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवून देखील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येत नसल्याने विद्यार्थी व पालक आर्थिक विवंचनेत सापडले असून त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी मु‘यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. 

        सदरील प्रस्ताव तातडीने मंजूर करून सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात संबंधित पात्र विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी त्वरित जाहिरात प्रसिध्द करून परदेशी शिष्यवृत्ती योजनेची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.