आमदार गीता जैन यांनी केली महापालिका अभियंत्याला मारहाण

मीरा भाईंदर:- एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या दोन कनिष्ठ अभियंत्यांना बोलावून घेऊन त्यांना आमदार गीता जैन यांनी मारहाण करण्याचा प्रकार पेणकर पाडा भागात घडला असुन त्याचा व्हिडिओ शहरात प्रचंड वायरल झाला आहे. अशा प्रकारे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्याचे खच्चीकरण होत असल्याच्या भावना कर्मचारी व्यक्त करत आहेत.

मीरा भाईंदर महापालिकेचे कनिष्ठ अभियंता शुभम पाटील आणि संजय सोनी या दोघांनी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पेणकर पाडा भागातील कक्कड इमारती जवळील अनधिकृत पक्के बांधकामावर चार दिवसांपूर्वी तोडक कारवाई केली होती. त्याच ठिकाणी आज या दोन्ही अभियंता यांना आमदार गीता भरत जैन यांनी बोलावून घेतले आणि महापालिका सुरक्षा रक्षक, आमदारांचे सुरक्षा रक्षक, त्यांचे स्विय सहाय्यक तसेच इतर कार्यकर्ते यांच्यासमोर मारहाण केली. त्याचे शर्ट पकडून त्याला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ सुध्दा शहरात वायरल झाला आहे.

या प्रकाराचा महापालिका कर्मचाऱ्यांनी निषेध केला असून, अशा प्रकारामुळे इतर कर्मचाऱ्यांचे मनोधैर्याचे खच्चीकरण होते, त्यांच्या कामावर विपरीत परिणाम होतो, अशा भावना अभियंत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील एका कुटुंबाचं घर पाडण्यासाठी पालिकेच पथक गेलं होतं. बेघर होण्याच्या भीतीने या कुटुंबाने आमदार गीरा जैन यांच्याकडे धाव घेतली. यावेळी गीता जैन यांनी घटनास्थळी धाव घेत कारवाईचा बडगा कशासाठी असा जाब विचारला.

यावेळी गीता जैन यांनी पालिकेच्या अभियंत्याला “लहान मुलं असलेलं घर पाडायला तुम्ही आला आहात माणसं आहात की राक्षस” असं सुनावलं आहे. यावेळी ज्यांच्या घरावर कारवाई करण्यात येत होती ती महिला जैन यांना रडून होत असलेल्या कारवाई बाबत सांगत होती. यावेळी आमदार गीता जैन चिडल्या आणि त्यांनी महापालिकेचे अभियंता शुभम पाटील यांची कॉलर पकडत त्यांच्या कानशिलात लगावली. या घटनेच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आमदारांनी दिलं स्पष्टीकरण

या कृतीबाबत आमदार गीता जैन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्या म्हणाल्या की, मी अभियंत्याला म्हणाले की पावसाळ्यात अनधिकृत असली तरी त्या घरांमध्ये कोणी राहत असल्यास ती तोडू नये, असे शासनाचे आदेश आहेत. मी हे त्या अभियंत्याच्या लक्षात आणून देत होते. पण, मी बोलत असताना अभियंता हसत असल्याने माझा पारा चढला आणि मी त्याच्या कानशिलात लगावल्या, असं गीता जैन यांनी सांगितलं आहे.