महाराष्ट्रात निर्बंध १५ एप्रिलपर्यंत राहणार,संध्याकाळी 8 नंतर सार्वजनिक ठिकाणे बंद

मुंबई, दि. २७ :- राज्यामध्ये कोरोनाचा उद्रेक होत असल्याने लागू निर्बंध मर्यादा १५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.ज्यामध्ये संध्याकाळी 8 ते सकाळी 7 पर्यंत सर्व सार्वजिनक ठिकाणे बंद राहणार आहेत. आज मध्य रात्रीपासून हे नवे नियम लागू होणार आहेत.राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती. ज्यात आता आणखी भर पडली आहे.

राज्यात १५ एप्रिलपर्यंत अगोदर लागू केलेले सर्व निर्बंध पाळावे लागतील. त्याचप्रमाणे मास्क लावणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, आदी सर्व आदेश पाळावे लागतील. कार्यालयात यापूर्वी लागू केलेले सर्व निर्बंधांसह काम करण्याची मुभा असेल. कंटेनमेंट झोन घोषित करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेतील. पाच पेक्षा जास्त लोकांसाठी रात्री आठ ते सकाळी सात पर्यंत जमावबंदी आदेश २७ मार्च २०२१ पासून लागू करण्यात आलेला असून १५ एप्रिल पर्यंत अंमलात असेल. याचे उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागेल.

इतर निर्बंधांमध्ये सार्वजनिक उद्याने व सागरी किनारे रात्री आठपासून सकाळी सात पर्यंत बंद असतील. सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय आणि धार्मिक कार्यक्रमांना १५ एप्रिलपर्यंत परवानगी नसेल. त्याचप्रमाणे अशा जमावासाठी सभागृह तथा कक्षांचा वापर करण्यावरही निर्बंध असेल. लग्नकार्यात कमाल ५० लोक तर अंतिम संस्कारासाठी २० लोकांना हजर राहण्याची अगोदर दिलेली परवानगी १५ एप्रिलपर्यंत लागू असेल.

सर्व खाजगी कार्यालय आरोग्याशी संबंधित सर्व नियमांचे पालन करून 50 टक्के उपस्थितीतीसह काम करतील. अशा ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार नाही. तर शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर आणि सार्वजनिक वापरासाठी सॅनीटायझरची व्यवस्था करावी लागेल.

सर्व एक पडदा व मल्टीप्लेक्समधील चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृहे, उपाहारगृहे रात्री 8 ते सकाळी 7 वा. पर्यंत बंद राहतील. मात्र या वेळात टेक होम डिलिव्हरी सुरु राहील. याचा कुणी भंग केल्यास सबंधित चित्रपटगृह, मॉल, उपाहारगृह, हॉटेल हे कोविड -19 ची साथ असे पर्यंत बंद करण्यात येईल. सबंधित आस्थापनेला दंडही ठोठावण्यात येईल.
घरीच विलगीकरण ( होम आयसोलेशन) बाबतीत कोणत्या वैद्यकीय व्यावसायिकाच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत ते स्थानिक प्रशासनाला कळवावे लागेल तसेच गृह विलगीकरणात सर्व काळजी घेण्याची जबाबदारी त्या डॉक्टरची राहील. रुग्णाने विलगीकरण नियमांचा भंग केल्यास संबंधित डॉक्टरवर त्याची माहिती लगेच स्थानिक प्रशासनाला कळविण्याची जबाबदारी राहील. त्या डॉक्टरला अशा परिस्थितीत संबंधित रुग्णाच्या उपचार व देखरेखीच्या कामातून मुक्त होता येईल.  
कोविड रुग्ण असल्याबाबत संबंधित स्थळी दरवाज्यावर १४ दिवसांसाठी तसा सुचना फलक लावण्यात येईल. गृह विलगीकरण शिक्काही रुग्णाच्या हातावर मारण्यात येईल 
खासगी आस्थापना ( आरोग्य व आवश्यक सेवा वगळून) ५० टक्केपर्यंत कर्मचारी उपस्थित ठेवता येतील तर शासकीय व निमशासकीय कार्यालयांना त्यांचे विभाग किंवा कार्यालय प्रमुख कोविड परिस्थिती विचारात घेऊन उपस्थितीबाबत कर्मचारी संख्या निश्चित करतील. 
उत्पादन क्षेत्र मात्र पूर्ण क्षमतेने काम सुरु ठेवू शकते.
शासकीय कार्यालयांतील गर्दी कमी करण्यासाठी अभ्यागत नागरिकांना अगदी आवश्यक आणि तत्काळ कामांसाठीच प्रवेशाची परवानगी देण्यात येईल. बैठका आदि कामासाठी निमंत्रित केले असल्यास विशेष प्रवेश पास कार्यालयामार्फत दिला जाईल हे कार्यालय किंवा विभाग प्रमुखाने पाहावे  
सर्व धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाने दर तासाला कमाल किती भाविक असावेत ते निश्चित करावे. त्या ठिकाणी वावरण्यास पुरेशी जागा व आरोग्याचे नियम पाळले जात आहेत किंवा नाहीत ते सुनिश्चित करावे. ऑनलाईन आरक्षणावर भर द्यावा