करंजगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात भरवली शाळा

विद्यार्थ्यांचे शाळा दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन

वैजापूर ,१५ जून/ प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील नऊपैकी पाच शाळा खोल्या मोडकळीस आल्या असून छताचे पत्रे वादळी वाऱ्यांनी उडून गेले आहेत. त्यामुळे शाळेची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी शालेय व्यवस्थापन समितीने वारंवार पाठपुरावा केला. मात्र कुठलीही कार्यवाही न झाल्याने करंजगाव येथील ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी यांनी वर्गखोल्या मिळवण्यासाठी थेट पंचायत समिती कार्यालयातील शिक्षणाधिकारी कार्यालय गाठुन तेथेच शाळा भरवली.

या अनोख्या आंदोलनामुळे खडबडुन जागे झालेल्या पंचायत समितीने तातडीने जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेच्या अनुषंगाने २०२२-२३ मधील जिल्हा वार्षिक योजनेतून एक वर्ग खोली मंजुर करण्यात आली असून जिल्हा परिषद उपकर व स्व उत्पन्नातुन इतर वर्ग खोल्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तसेच मोडकळीस आलेल्या पाच वर्ग खोल्या पाडण्याबाबतही प्रस्तावित करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे यावेळी सांगण्यात आले व तसे लेखी पत्र आंदोलकांना देण्यात आले.‌ 

या शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असून जवळपास दोनशे विद्याथी शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापकासह नऊ शिक्षक कार्यरत आहेत. मागील दोन वर्षांपासून शाळा खोल्या गळत असल्याने मंगल कार्यालयात ज्ञानदानाचे काम करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे संचालक कल्याण दांगोडे यांनी शाळा खोल्यांबाबत आमदार रमेश बोरनारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दोन खोल्या बांधून देण्याचे आश्वासन दिले. गटशिक्षणाधिकारी हेमंत उशीर यांना आंदोलकांनी घेराव घातला होता. शालेय समितीचे अध्यक्ष सुनील उगले, उपाध्यक्ष शैला मोकळे, सतीश रावते, बद्रीनारायण मगर, कविता दांगोडे, मनकरण घोडके, रविंद्र मोकळे, आप्पासाहेब घोडके, अशोक उशीरे, सचिन घोडके आदींनी प्रभारी गटविकास अधिकारी एच.आर.बोयनर यांना निवेदन दिले.