‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा गुजरातला मोठा फटका बसणार; सतर्कतेचा इशारा! भूकंपाचाही धोका!

अहमदाबाद : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचे अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले असून हे वादळ आता गुजरातच्या दिशेने सरकल्याचा अंदाज आहे. हे वादळ काल मुंबई किनारपट्टीपासून ५४० किमी अंतरावर होते. यामुळे मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. तर, मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात रात्री जोरदार वारा सुटला होता. यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते.

याआधी अरबी समुद्रात निर्माण झालेले हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, अत्यंत तीव्र रुप धारण केलेल्या या वादळाने आता आपली दिशा बदलली असून ते आता गुजरातच्या दिशेने सरकत असल्याचा अंदाज आहे. उत्तर गुजरातच्या किनारपट्टीकडे थोडेसे पूर्वेकडे हे वादळ सरकण्याचा अंदाज आहे. तसेच १५ जून रोजी येथे भूकंपाचा धोकाही संभवतो.

“दिशा बदलल्याने गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर २-३ मीटरचे वादळ निर्माण होऊ शकते. यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घरांचे आणि रस्त्यांचे नुकसान, पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, शेती फळबागांच्या नुकसानीचीही भीती आहे. रेल्वे, पॉवरलाईन, सिग्नलिंग यंत्रणाही बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे”, असे प्रादेशिक विशेष हवामान केंद्राच्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे. ते १५ जूनपर्यंत सौराष्ट्र आणि कच्छची सीमा पार करून गुजरातचा मांडवी आणि पाकिस्तानातील कराची या पाकिस्तानी किनाऱ्यांना धडकेल, असेही या बुलेटीनमध्ये नमूद आहे.

हे वादळ गुजरातची सीमा टाळून पाकिस्तानकडे रवाना होईल, असा अंदाज शनिवारी लावण्यात आला होता. परंतु, सध्याच्या बुलेटिनमध्ये हे वादळ गुजरातची सीमा टाळेल, असा कोणताही अंदाज वर्तवण्यात आला नाही.हे वादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकल्यानंतर येथे भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु, तोपर्यंत या वादळाची क्षमता कमी झालेली असेल. अत्यंत तीव्र चक्रीवादळ सौम्य होण्याची शक्यताही सांगण्यात आली आहे. परंतू किनारपट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागढ आणि मोरबी जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सहा जिल्ह्यांमधील त्यांचे कार्यक्रम पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. “चक्रीवादळ आपल्या दिशेने सरकत आहे. म्हणून, प्रत्येकजण प्रार्थना करुया की हे वादळ गुजरातला धडकले तरी कमीत कमी नुकसान होईल. या वादळाचा गुजरातला फटका बसणार असल्याची शक्यता आहे,” असे पटेल यांनी छोटा उदेपूर जिल्ह्यातील बोडेली येथे एका मेळाव्यात सांगितले.