‘बिपरजॉय’ वेगाने गुजरातच्या दिशेने; खबरदारी म्हणून ६७ रेल्वे गाड्या रद्द

कच्छ-सौराष्ट्रातील किनारपट्टीपासून १० किमीपर्यंतचा परिसर केला रिकामा

अहमदाबाद ​,​१३​ जून / प्रतिनिधी :-अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाचा देशाला फटका बसण्याची दाट शक्यता आहे. यामुळे अरबी समुद्र खवळला असून मराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर याचे परिणाम जाणवायला लागले आहेत. गणपती पुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर मोठमोठ्या लाटा उसळताना दिसत आहेत. तर मुंबईच्या मरिन ड्राइव्हवर देखील समुद्राचा रुद्रावतार दिसून येत आहे. आता हे वादळ गुजरात राज्यात धडकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिपरजॉय वेगाने गुजरातच्या दिशेने जात आहे. IMDने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार बिपरजॉय १५ जून रोजी संध्याकाळपर्यंत जखाऊ बंदराजवळील सौराष्ट्र आणि कच्छ पार करणार आहे. यानंतर हे वादळ कराचीला जाऊन धडकणार असल्याचं सांगितलं जात आहे. या वादळाचा धोका लक्षात घेता प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

 गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा १४ जूनला ऑरेंज तर १५ जूनला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमधील जखाऊ पोर्टजवळून ओलांडण्याची शक्यता आहे. हे वादळ १५ जूनला दुपारी ताशी १२५-१३५ किलोमीटर वाऱ्यांच्या वेगासह धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

जामनगर परिसरात अनेक तेल कंपन्यांच्या रिफायनरी, सोबतच कांडला पोर्ट देखील असल्याने चक्रीवादळामुळे (Cyclone Biperjoy) मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

या चक्रीवादळामुळे (Cyclone Biperjoy) कोकण-गोवा भागात तर १५ जूनला गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कच्छ-सौराष्ट्रातील किनारपट्टीपासून १० किमीपर्यंतचा परिसर रिकामा केला असून आतापर्यंत ७५०० लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गुजरातच्या कच्छ, पोरबंदर, द्वारका, जामनगर, जुनागढ आणि मोरबी या किनारी जिल्ह्यांतील वादळग्रस्त भागातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. आणखी २३ हजार लोकांना स्थलांतरित करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.

वादळामुळे (Cyclone Biperjoy) गुजरातच्या किनारी भागात विजांचा कडकडाट आणि पाऊस सुरू आहे. त्यामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. यातील दोन मुले भुज येथील असून, त्यांच्या अंगावर भिंत पडली, तर एका महिलेवर झाड पडले.

बिपरजॉयमुळे खबरदारी म्हणून भारतीय रेल्वेने ६७ गाड्या रद्द केल्या आहेत. या गाड्या १५ जून पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच गुजरातमध्ये १५ आणि १६ जून रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मच्छिमारांना देखील समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून याबाबतच्या सुचना जारी करण्यात आल्या आहेत. बिपरजॉयमुळे प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलं असून गुजरातच्या भावनगर, राजकोट, गांधीधाम, आणि अहमदाबादमध्ये आपत्कालीन कक्ष उघडण्यात आले आहेत. तसेच अतिरिक्त हेल्पलाईन क्रमांक सक्रिय केले आहेत.

या वादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. यावेळी त्यांनी वादळासंबंधिच्या पूर्वतयारीची माहिती घेतली. यावेळी मोदींनी या आपत्तीच्या काळात केंद्रसरकार सर्वोतोपरी मदत करेल असे आश्वासन दिले आहे.

बिपरजॉय म्हणजे काय

अरबी समुद्रार ६ जून रोजी आलेल्या या वादळाला बिपरजॉय असे नाव देण्यात आले. बिपरजॉय हा बंगाली शब्द असून त्याचा अर्थ संकट असा होतो. या वादळाला बिपरजॉय हे नाव बांगलादेशने दिले आहे. या वादळामुळेच यावर्षी मान्सूनला उशीर झाला आहे. दरवर्षी १ जून रोजी केरळात दाखल होणारा मान्सून यावर्षी ८ जूनला दाखल झाला आहे. यानंतर महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन व्हायला ११ जून उजाडला आहे. अद्यापही मान्सूनने सर्व राज्य व्यापले नाही.