अनिल परब यांच्याविरोधात चार्जशीट दाखल

किरिट सोमय्या यांनी दिली माहिती

मुंबई, ११ जून / प्रतिनिधी :- दापोली येथील साई रिसॉर्ट घोटाळ्या प्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) पुन्हा अ़डचणीत येण्याची शक्यता आहे. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.

अनिल परब आणि तिथल्या सरपंचाविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे माझा आणि रिसॉर्टचा काही संबंध नाही, असे बोलण्याची संधी अनिल परब यांना मिळणार नाही. त्यांच्याविरोधात पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे. अनिल परब सध्या जामिनावर आहेत आणि मला विश्वास आहे, की ज्यावेळी हा खटला सुरू होईल. अनिल परब यांच्यावर जे चार्जेस आहेत ते पाहता त्यांना तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे मत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले.
मोदी अॅट 9 या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या संमेलनानंतर सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना अनिल परब यांच्याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी सोमय्या यांनी हे वक्तव्य केले.

ते म्हणाले, गेल्या ९ वर्षात भारताने मोठी प्रगती केली. विरोधक म्हणत होते की काश्मिरातून ३७० कलम हटवल्यास हिंसा भडकेल परंतु तसे काहीच झाले नाही. हे सरकारचे मोठे यश असल्याचे सोमय्या म्हणाले.