केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा होणार वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकार या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के झाला होता. सरकार पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ करू शकते, अशी माहिती मिळत आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढला तर तो आता ४६ टक्क्यांवर पोहोचेल. त्यामुळे त्याचा पगार वाढणार आहे.महागाईचा दर पाहता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवते. महागाई जितकी जास्त तितकाच डीए वाढतो. कामगार ब्युरो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीची गणना करते. याची गणना ग्राहक किंमत निर्देशांकच्या आधारे केली जाते.

किती वाढणार पगार?

डीएमध्ये चार टक्के वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते, हे समजून घेऊ. समजा केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन १८ हजार रुपये आहे. जर आपण ३८ टक्के पाहिले तर डीए ६,८४० रुपये होतो. दुसरीकडे ४२ टक्के पाहिल्यास ते ७,५६० रुपये होईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात ७२० रुपयांची वाढ होणार आहे.

सरकारने मार्च २०२२ मध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली होती. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ टक्क्यांवरून ३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. यानंतर दोनदा डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. डीए हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा भाग आहे. महागाईचा दर पाहता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवते