वैजापूर पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून लाभार्थ्यांची लूट पैसे घेतल्याशिवाय प्रस्ताव मंजूर होत नसल्याचा सरपंचांचा आरोप

आ. बोरनारे यांच्या अध्यक्षतेखाली रोहयो कामांची आढावा बैठक 

वैजापूर ,​२​ जून/ प्रतिनिधी :- रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीसाठी ४० हजार, शेततळे ५० हजार तर गाय गोठा लाभासाठी दहा हजारांची आर्थिक रक्कम मोजल्यानंतर लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजुर करण्याचा गैरप्रकार कार्यरत अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या दलालांनी येथे सुरु केल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट रोजगार हमी योजना आढावा बैठकीत सरपंचानी केला.या आरोपांची आ.  रमेश बोरनारे यांनी गंभीर दखल घेऊन ग्रामीण भागातील सर्वसामान्य लाभार्थ्यांची रोजगार हमी योजनेचा लाभ देतांना नियमबाह्य आर्थिक  पिळवणूक करणा-या अधिकारी, कर्मचा-यावर वरिष्ठा मार्फत लवकरच चौकशी करुन कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी बोलताना दिला.

दरम्यान रोजगार हमी योजनेत व्यैक्ति योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अधिकारी, कर्मचा-याच्या दरपत्रकांची रक्कम ऐकून बैठकीला उपस्थितीत लोकप्रतिनिधी अवाक झाले होते. पंचायत समिती सभागृहात बुधवारी आ.रमेश बोरनारे यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजनेतील कामाचा आढावा बैठक पार पडली.या बैठकीला पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब जगताप, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र सांळुके, बाजार समितीचे संचालक गणेश इंगळे, प्रशांत त्रिभुवन, गोरख आहेर गटविकास अधिकारी एच. आर. बोयनर, सहाय्यक गटविकास अधिकारी अमेय पवार यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

३ हजार १०० सिंचन विहिरी व १ हजार ४७४ शेततळे , ७८७ गाय गोठा कामाना प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे आ.बोरनारे यांनी सांगितले.गावपातळीवर रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना काही प्रशासकीय अडचण येते का यांची माहिती त्यांनी उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना विचारली असता लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश इंगळे यांनी विहिरी साठी ४० हजार, शेतळयाला ६० हजार   गाय गोठा मंजूर करण्यासाठी १० हजारांची रक्कम घेतल्या नंतर प्रस्ताव मंजूर होत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट त्यांनी तक्रार मांडताना व्यक्त केली.तसेच शिवराईचे राजेंद्र चव्हाण यांनी रोजगार हमी विभागाकडे पैसे न देता नियमानुसार दाखल केलेल्या संचिकेतून कागदपत्रे गहाळ होण्याचा प्रकार केला जातो. रोजगार हमी कक्षात मजुरांचे हजेरीपत्रक ऑनलाईन करण्यासाठी कार्यरत कर्मचारी हजार रुपये घेतल्याशिवाय काम करत नाही.असा आरोप बोरसरचे अरुण होले यांनी केला.

पंचायत समितीचे काही माजी पदाधिकारी लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली लाभार्थ्याकडून पैसे जमा करत असल्याची तक्रार चोरवाघलगावचे दादासाहेब मोईन यांनी केली.पेव्हर ब्लाॅक योजनेतील कामे झाले मात्र पैसे मिळत नसल्याने साहित्य पुरवठादाराकडून पैशासाठी तगाद होत असल्याची तक्रार दौलत गायकवाड यांनी केली.

बैठकीत रोजगार हमी योजनेत अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या दलालांनी मांडलेल्या आर्थिक देवाणघेवाण प्रकारावर आ.बोरनारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.रोजगार हमी योजनेचे जिल्हा समन्वयक श्री.मालपाणी यांच्याशी त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे बैठकीतून संपर्क करुन गावपातळीवर हजेरी पत्रक ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश दिले.तसेच वैजापूर तालुक्यातील ४३ ग्रामपंचायत क्षेत्रात पेव्हर ब्लाॅक योजनेतील किती कामाचे मूल्यांकन केले.यावर १० कामाचे मूल्यांकन पुर्ण झाल्याची माहिती अधिका-यांनी दिल्यानंतर सरपंचानी ३१ मार्च पुर्वीच बहुतांश कामे पुर्ण झाल्याची सांगितल्यावर या विषयावर आ.बोरनारे यांनी खंत व्यक्त करुन कामकाजात सुधारणा करा अशी तंबी त्यांनी दिली.या बैठकीला सरपंच चंद्रकांत पवार, राजू छानवाल, नितीन सांळुके,सुरेश पवार, सुदाम आहेर, राजेंद्र बावचे आदीची उपस्थिती होती.