शिवाजीनगर येथे अत्याधुनिक बसस्थानक निर्माण करणार – परिवहनमंत्री ॲड.अनिल परब

पुणे, ,१८जून /प्रतिनिधी : शिवाजीनगर हे पुणे शहरातील मुख्य गर्दीचे  ठिकाण असल्याने येथे उभारण्यात येणारे एसटीचे बसस्थानक अत्याधुनिक पद्धतीने निर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी आज केले. ते पुढे म्हणाले की, मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती देऊन भविष्यात कमीत कमी वेळात बसस्थानकाची उभारणी करण्याला प्राधान्य देण्यात येईल. यासाठी प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती पाहाणे, त्या अनुषंगाने बसस्थानकाची उभारणीचे नियोजन करणे, हे या प्रत्यक्ष भेटीचे प्रयोजन होते.

तथापि, आज परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी आज शिवाजी नगर येथील रा.प. महामंडळाच्या जागेवरील मेट्रो कामकाजाची पाहणी केली. यावेळी  उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने,रा.प. महामंडळ वास्तुविशारद व महाव्यवस्थापक (बांधकाम) भूषण देसाई, मेट्रोचे अतिरिक्त मुख्य अभियंता राजेश जैन यांच्या संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.

शिवाजीनगर येथील एसटीच्या जागेवरील मेट्रोच्या कामाची पाहणी करीत असतांना संबंधित मेट्रो प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुणे मेट्रोच्यावतीने सध्या सुरू असलेले काम जुलै-२०२२ पर्यंत  पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यानंतर  एसटी महामंडळाच्या शिवाजी नगर येथील जागेवर अद्ययावत बसस्थानक उभारेल, असे परिवहनमंत्री ॲड. परब यांनी सांगितले.

परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांनी वाकडेवाडी येथील बसस्थानकाची केली पाहणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या वाकडेवाडी येथील बसस्थानकाची पाहणी केली.

प्रवाश्यांची गैरसोय होता कामा नये. प्रवाश्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी, बसस्थानक व बसेसमध्ये स्वच्छता राखावी. प्रवाशी, अधिकारी व कर्मचारी मास्क, सॅनिटायझरचा वापर करतील, याबाबत दक्षता घेण्याची सूचना परिवहन मंत्री ॲड.परब यांनी दिल्या.

त्याच बरोबर लालपरी, शिवशाही, निमआराम बसेसची पाहणी केली.परिवहनमंत्री ॲड. परब यांना आगार प्रमुख अनिल भिसे यांनी बसस्थानकवरील सोई-सुविधा बाबत माहिती दिली.