संसद भवनाची नवी वास्तू उभारणाऱ्या श्रमिकांचा पंतप्रधानांनी केला सन्मान

नवी दिल्ली,२८ मे / प्रतिनिधी:- संसद भवनाची नवी वास्तू उभारणाऱ्या श्रमिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रत्यक्ष भेटून संवाद साधला आणि त्यांचा सन्मान केला. या श्रमिकांचं योगदान चिरंतन स्मरणात रहावे, यासाठी या नव्या वास्तुमध्ये  एक स्वतंत्र दालन आहे.

पंतप्रधान आपल्या ट्विट संदेशात म्हणतात:

“आज संसद भवनाच्या नव्या वास्तूचे उद्घाटन करत असताना आपण ही वास्तू उभारणार्‍या श्रमिकांचा, त्यांनी समर्पित भावनेने केलेले अथक परिश्रम आणि कुशल कारागीरी यासाठी सन्मान करतो.”

नवीन संसद भवनाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या श्रमिकांशी झालेल्या संवादाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.  ही वास्तू उभारताना 60,000 श्रमिकांना रोजगार मिळाला. त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकणारी नवीन गॅलरी सभागृहात उभारण्यात आली आहे. श्रमिकांचे योगदान संसद भवनात कायमस्वरूपी राहण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.