तोक्ते चक्रीवादळासंदर्भात तयारीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती

तोक्ते चक्रीवादळासंदर्भात तयारीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती

मुंबई, दि १६ : अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळामुळे सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोरोना परिस्थितीत रुग्णालयांचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये तसेच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यादृष्टीने अगोदरच तयारी करून ठेवली असून प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत दिली.

आज सकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र, गुजरातचे मुख्यमंत्री तसेच दादर नगर हवेलीचे प्रशासक यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला.

चक्रीवादळात नुकसान होऊ नये म्हणून राज्य शासनाने केलेल्या तयारीबाबत सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, रुग्णालयांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही तसेच बॅकअप यंत्रणा लगेच कार्यान्वित होईल व रुग्णांच्या उपचारांत अडथळा येणार नाही यासाठी सावध राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जम्बो व इतर कोविड केंद्रे ही पावसापासून संरक्षण करणारी असली तरी मोठे वादळ झाल्यास समस्या उद्भवू शकते, हे लक्षात घेऊन सावधगिरी म्हणून मुंबई तसेच इतरत्रही या केंद्रांतील रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. सध्याच्या काळात ऑक्सिजनची गरज लक्षात घेता सागरी किनाऱ्यांवरील ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांमधील उत्पादन व वाहतूक सुरळीत सुरु राहील यासाठी नियोजन केले आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस यांना  विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. किनाऱ्यांवरील कच्च्या घरांतील लोकांना दुसरीकडे हलविण्यात आल्याचेही ते म्हणाले. मंत्रालय नियंत्रण कक्ष सज्ज असून इतरही जिल्ह्यातील नियंत्रण कक्षांशी त्यांचा व्यवस्थित समन्वय आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

याप्रसंगी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील विस्तृत माहिती दिली ती खालीलप्रमाणे:

सागरी किनाऱ्याजवळील डोलवी जेएसडब्ल्यू ( २३० मेट्रिक टन), डोलवी आयनॉक्स  ( १२० मेट्रिक टन), लिंडे तळोजा ( २४५ मेट्रिक टन), आयनॉक्स रायगड (१२० मेट्रिक टन), लिंडे प्राक्स एअर मुरबाड ( १२० मेट्रिक टन), असे साधारणत: ९०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन करणारे प्रकल्प सुरक्षित राहतील याबाबत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्हाधिकारी तसेच मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

सागरी किनाऱ्याच्या अगदी जवळ डोलवीचा ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प आहे. येथील डबल फिडर विद्युत पुरवठा आणि मजबूत वायरिंग यामुळे चक्रीवादळाच्या तीव्रतेतही नुकसान होणार नाही. तरी देखील महावितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम तसेच प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अपवादात्मक परिस्थितीत डोलवी किंवा इतर कुठल्याही  ऑक्सिजन प्रकल्पास काही समस्या उद्भवली तर खालीलप्रमाणे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

चक्रीवादळाचा परिणाम होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये किमान १२ ते १६ तासांचा ऑक्सिजन बॅक अप देण्याची व्यवस्था केली आहे

जामनगरहून १६० मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा टँकर्सद्वारे उद्यापर्यंत पोहचत आहे. जामनगर येथेही १८ मे रोजी चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असल्याने जामनगर प्रकल्पात जर काही प्रश्न उद्भवल्यास डोलवी, मुरबाड,तळोजा आणि भिलाईहून राखीव साठा मागवता येईल

पुणे येथे ३० ते ४० मेट्रिक टन जादा ऑक्सिजन साठा आहे, काही प्रश्न उद्भवल्यास अंगुलहून ६० मेट्रिक टन आणि भिलाईहून जादा साठा आणून भरपाई करण्यात येईल. जे प्रकल्प सुस्थितीत आहेत तिथूनही जादा साठ्याची व्यवस्था करता येईल.

सागरी जिल्ह्यातील मच्छीमारांना यापूर्वीच चक्रीवादळासंदर्भात आगाऊ इशारा देण्यात आला असून ते सर्व बोटींसह किनाऱ्यांवर परतले आहेत. पालघरमधील काही मच्छिमार परतत आहेत.  किनाऱ्यांवरील कच्ची घरे रिकामी करण्यात आली आहेत. किनारी भागातील कुठलीही आरोग्य यंत्रणा कच्च्या घरात/ बांधकामात नाही हे पाहण्यात आले आहे. सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये कोविड तसेच नॉन कोविड रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात औषधी उपलब्ध आहेत, यात रेमडेसिवीर ,फेवीपिरावीर, मिथाइल प्रेडनिसोलोन, डोक्सीसिलीन, पॅरासिटामोल, हेप्रीन, एम्फोटेरीसीन बी आणि चाचणी किट्स, पीपीई इत्यादी पुरेशा प्रमाणात असतील हे पाहण्यात आले आहे.

आजच्या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, प्रधान सचिव मदत पुनर्वसन असीम गुप्ता, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वैद्यकीय सुविधांच्या ठिकाणी पुरेशी वीज उपलब्ध राहील, यासाठी व्यवस्था ठेवण्याचे अमित शहा यांचे निर्देश

नवी दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 मे 2021 रोजी घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीपाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरात आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत  तसेच  दमण आणि  दीव व दादरा नगर हवेलीच्या प्रशासकांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. ‘तौते’ चक्रीवादळामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालये/ संस्था यांच्या सज्जतेच्या आढाव्यासाठी ही बैठक होती.

या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी,चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणच्या सर्व आरोग्य सुविधांच्या सज्जतेचा विशेषत्वाने आढावा घेतला.

सर्व कोविड रुग्णालये,प्रयोगशाळा,लसींसाठीची शीतसाखळी आणि इतर वैद्यकीय सुविधांच्या ठिकाणी पुरेशी वीज उपलब्ध राहील, यासाठी व्यवस्था ठेवण्याचे निर्देश अमित शहा यांनी  राज्य प्रशासक/ जिल्हाधिकाऱ्यांना दिले. याखेरीज वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालयांमध्ये सर्व आवश्यक औषधांचा,साधनांचा  पुरेसा साठा ठेवण्याचा  सल्ला गृहमंत्र्यांनी दिला. चक्रीवादळाच्या संभाव्य  मार्गावरील सर्व आरोग्य सुविधांना हानी टाळण्यासाठी आणि रुग्णांना सुखरूप हलविण्यासाठी पुरेशा सोयी करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले.  ऑक्सिजन निर्मिती संयंत्रांजवळच्या तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये सुरक्षेचे उपाय योजण्याचे आणि आवश्यकता भासल्यास तिथल्या रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्याचे  निर्देशही अमित शहा यांनी दिले.

महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या ऑक्सिजन निर्मिती संयंत्रावर चक्रीवादळाच्या प्रभावाचा गृहमंत्र्यांनी आढावा घेतला. 

ऑक्सिजनचा दोन दिवसांचा अतिरिक्त साठा राहावा, यासाठी आगाऊ नियोजन करण्याचे आणि संबंधित राज्यांकडे ऑक्सिजन टँकर्स रवाना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.  जेणेकरून कोणताही अडथळा निर्माण झाल्यास पुरवठ्यावर परिणाम  होणार नाही. रुग्णालयांना व आरोग्य सुविधांना अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी वीज प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचे आदेशही गृहमंत्र्यांनी दिले. गुजरातमध्ये चक्रीवादळाचा संभाव्य धोका असलेल्या भागात  औद्योगिक समूहांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या  सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे आणि उद्योगांनीही दक्ष  राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकार आणि सर्व केंद्र सरकारी संस्थांकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले. 

परिस्थितीशी सामना करण्यासाठी शासकीय आणि खासगी अशा  जास्तीत जास्त संसाधनांचा उपयोग केला पाहिजे. खाजगी उद्योगांशी समन्वय साधून त्यांच्या आपत्ती व्यवस्थापनाची शाखा पूर्णपणे सज्ज ठेवण्याचे निर्देश  गृहमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.  स्थानिक पातळीवर सामाजिक हेतूसाठी कार्यरत असलेल्या संस्था आणि स्वयंसेवकांसोबत  समन्वयाने  काम करावे, असे गृहमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना  सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हे संकट यशस्वीपणे हाताळेल असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.

केंद्रीय गृह मंत्रालयात 24×7 नियंत्रण कक्ष कार्यरत असून राज्यांनी कुठल्याही साहाय्यासाठी कधीही संपर्क साधावा असे अमित शहा यांनी सांगितले भारतीय तटरक्षक दल , नौदल, सैन्यदल आणि हवाई दल तैनात करण्यात आले असून विमाने आणि हेलिकॉप्टरद्वारे हवाई गस्त सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांना सुखरूप सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्र्यांनी  वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. आरोग्यविषयक सुविधा, ऑक्सिजन,वीज   दूरसंचार, पिण्याचे पाणी इत्यादींसह  अत्यावश्यक सुविधा अबाधित राहतील याची काळजी घेण्याचे आणि नुकसान झाल्यास त्या पुन्हा सुरळीत करण्यासाठी आवश्यक सर्व पावले उचलण्यास त्यांनी सांगितले.

ऑक्सिजन निर्मिती संयंत्राचे कार्यान्वयन व सर्व आरोग्य सुविधांच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार  सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन गुजरात व महाराष्ट्राच्या  मुख्यमंत्र्यांनी दिले.  

या बैठकीला कॅबिनेट सचिव, केंद्रीय गृह, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, ऊर्जा, उद्योग व अंतर्गत व्यापार चालना  विभाग, यांचे सचिव, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य  भारतीय हवामानशास्त्र विभाग व एनडीआरएफचे(राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ) महासंचालक उपस्थित होते; गुजरात आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव, दमण अँड दीव व दादरा नगर हवेलीचे प्रशासक, गुजरात व महाराष्ट्रातील संबंधित जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन सचिव, केंद्रीय गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय गृह मंत्रालय  राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश आणि संबंधित केंद्रीय संस्थांशी  सतत संपर्कात असून  एनडीआरएफने  बोटी, वृक्षतोड करणारे, टेलिकॉम उपकरणे इत्यादींनी सुसज्ज 50 पथके तैनात केली आहेत.  तर गुजरातमध्ये तैनात करण्यासाठी अतिरिक्त 15 पथके विमानांनी आणली जात आहेत.