‘खेलो इंडिया’अंतर्गत पायाभूत सुविधेसाठी राज्याला २०० कोटींचा निधी मिळावा – क्रीडा मंत्री सुनील केदार

नवी दिल्ली,२५मे /प्रतिनिधी :-

खेलो इंडिया अंतर्गत राज्यातील विविध प्रलंबित असणाऱ्या पायाभूत सुविधेसाठी २०० कोटीं रूपयांचा निधी मिळावा, अशी मागणी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजीजू यांच्याकडे केली.

श्री. केदार यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री श्री रिजीजू यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध क्रीडाबांबी चर्चा केली. राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याकरिता प्रलंबित असलेल्या 37 प्रस्तावासाठी राज्याला खेलो इंडियामधून २०० कोटी रूपयांचा निधी मिळावा, अशी मागणी श्री. केदार यांनी केली.

कांदिवली येथील क्रीडा संकुलसंदर्भात राज्य शासन आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) यांच्यामध्ये झालेल्या कराराप्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी. अशी चर्चा बैठकीत झाली. राज्य शासन आणि साईमध्ये झालेल्या कराराप्रमाणे कांदीवली येथील सराव शिबीराचे औरंगाबाद येथे राज्यशासनाने विनामुल्य उपलब्ध करून दिलेल्या जागेत सराव शिबिरे व्हावीत, अशी मागणीही श्री. केदार यांनी केली.

विदर्भातील आदिवासी भागातील खेळाडुंना अधिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी दुर्गम भागात केंद्र शासनातर्फे क्रीडा अकादमी सुरू करावी, असा प्रस्तावही श्री. केदार यांनी बैठकीत मांडला. यासह चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा येथे क्रीडा संकुल बांधुन तयार आहे, हे संकुल साईने लीजवर घेऊन याभागातील खेळाडुंना प्रोत्साहन द्यावे, असा प्रस्ताव आज श्री. केदारे यांनी केंद्रीय मंत्री श्री. रिजीजू यांच्या पुढे मांडला.

पोल्ट्री फार्म असणाऱ्यांना योग्य मोबदला मिळावा:सुनील केदार

पोल्ट्री फार्म असणाऱ्यांना आपत्ती काळात होणाऱ्या नुकसानीबाबत योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी, आज केंद्रीय पशुसंवर्धन व डेयरी मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे केली.  बर्ड फ्लु आणि अन्य साथीच्या रोंगामुळे एकाच वेळी अनेक कोबड्यांना मारावे लागते. यामुळे पोल्ट्री मालकाचे अतोनात नुकसान होते. अशा वेळी केंद्र व राज्य शासन मिळुन काही मदत पोल्ट्री फार्म मालकांना केली जाते. मागील 15 वर्षापासून केंद्र आणि राज्य मिळून  प्रत्येक कोबंड्यामागे 45:45 रूपये अशी मदत दिली जाते. ही मदत अपुरी असून ही आर्थिक मदत वाढवून किमान प्रत्येकी  100:100 रूपये असावी. अशी मागणी श्री केदार यांनी केली.

भारतीय गीर जातीच्या गायीवर ब्राझीलमध्ये  संशोधन होऊन अधीक दुधाळ संकर तयार झालेले आहे. ही नवीन संकरीत गीर गाय दिवसाला 25-27 लीटर दूध देते.  या गीर जातीच्या गायी भारतात आणुन शेतकऱ्यांना  द्याव्यात जेणे करून शेतकऱ्यांच्या जोडधंदा म्हणून असणाऱ्या दुग्ध व्यवसायाला भरभराट येईल. अशी माहिती देत या गीर गायी देशात आणण्याची मागणी श्री केदार यांनी केंद्रीय मंत्र्याकडे केली.

यासोबतच सानेन या जातीच्या बकऱ्या ज्या दिवसाला 10-12 लीटर दूध देतात. त्यांना देशात आणव्या जेणे करून येथील लोकांना या बकऱ्यांच्या दुधातून रोजगार वाढीसाठी मदत होईल, अशी मागणीही श्री. केदार यांनी केंद्रीय मंत्री यांच्याकडे केली.  या बकरीचे संकर नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, कॅनेडा, इजराईल येथे मोठ्या प्रमाणात आहेत.

दूध आणि भाजीपाल्यापासून बनविण्यात येणाऱ्य लोणीचा फरक समजण्यासाठी दोघांचा  रंग वेगवेगळा असावा, अशी मागणीही श्री केदार यांनी आज केंद्रीय मंत्री श्री गिरीराज सिंह यांच्याकडे केली.

दूधापासून तयार होणाऱ्या लोणीच्या तुलनेत भाजीपाल्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या  लोणीला कमी गुंतवणूक  लागते. मात्र, बाजारात आल्यावर दोघांची किंमत सारखी असते. यामुळे दुधापासून लोणी बनविणाऱ्यांना नुकसान होते.  यासाठी दोन्ही लोणींचा रंग वेगळा असावा. यासह  ग्राहकांनी कोणता लोणी खरेदी केले आहे हे कळण्यासाठी दोघांतील फरक स्पष्ट दिसावा. करिता लोणीचा रंग वेगळा ठेवण्याची, विनंती श्री. केदार यांनी केली.