शेवटच्या घटकापर्यंत निरोगी आयुष्याचे वरदान पोहोचवणे हा भारताचा प्रयत्न-पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताने कोविड-19 लसींच्या 300 दशलक्षपेक्षा अधिक मात्रा, दक्षिणेकडील देशांसह 100 देशांना पाठवल्या

भारतातील प्राचीन ग्रंथ आपल्याला, ‘वसुधैव कुटुंबकम’ तत्वाची शिकवण देतात

नवी दिल्ली,२१ मे / प्रतिनिधी:-  स्वित्झरलँडच्या जिनेव्हा इथे आयोजित, जागतिक आरोग्य संघटनेच्या 76 व्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरनसिंगच्या माध्यमातून भाषण केले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना, पंतप्रधानांनी सुरुवातीला सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि जनतेची सेवा करण्याची ऐतिहासिक 75 वर्षे पूर्ण केल्याबद्दल, जागतिक आरोग्य संघटनेचे अभिनंदन केले. जागतिक आरोग्य संघटना आपल्या शताब्दीपूर्ती पर्यंत म्हणजे पुढच्या 25 वर्षांसाठीची नवी उद्दिष्टे निश्चित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आरोग्यक्षेत्रात, अधिक समन्वय साधण्याच्या गरजेवर भर देतांना पंतप्रधानांनी जागतिक आरोग्य संरचनेतील अशा त्रुटी अधोरेखित केल्या, ज्या कोविड महामारीच्या काळात प्रकर्षाने जाणवल्या. हाच धागा पकडत, अशा संकटात टिकून राहणारी परिपूर्ण जागतिक आरोग्य व्यवस्था उभी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आणि जागतिक आरोग्य क्षेत्रात समानतेचे धोरण राबवण्याची आवश्यकता, यावर त्यांनी भर दिला. आंतरराष्ट्रीय आरोग्य क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबतची भारताची कटिबद्धता त्यांनी व्यक्त केली. याच संदर्भात, कोविडच्या काळात, भारताने कोविड-19 लसींच्या 300 दशलक्ष  पेक्षा अधिक मात्रा, दक्षिणेकडील देशांसह 100 देशांना पाठवल्या असेही सांगितले. आरोग्य विषयक संसाधनांची उपलब्धता सर्वांसाठी समान असेल, या धोरणाला पाठबळ देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना येत्या काळात कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“भारताचे पारंपरिक ज्ञान असे सांगते, की तुम्हाला काही आजार नाही याचा अर्थ तुम्ही सुदृढ आहात असा नाही” असे सांगत आपला प्रयत्न केवळ आजारांपासून दूर राहण्यापुरता मर्यादित असू नये, तर आपण निरामयतेच्या दिशेने एक पाऊल टाकायला हवे.” यासाठी योगाभ्यास, आयुर्वेद आणि प्राणायाम यांसारख्या पारंपरिक शास्त्रांचे लाभ समजावून सांगतांना पंतप्रधान म्हणाले, की यामुळे आपल्या शरीरीक, मानसिक आणि आरोग्याशी संबंधित सामाजिक पैलू अशा सर्व बाबतीत आपल्याला लाभ होती. जागतिक आरोग्य संघटनेचे पहिले जागतिक केंद्र भारतात स्थापन झाल्याबद्दल त्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला. तसेच, भरड धान्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यात, आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष महत्वाची भूमिका पार पाडत असल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.

‘भारताच्या प्राचीन ग्रंथांमधे, सांगितलेला ‘वसुधैव कुटुंबकम” हा मंत्र आपल्याला, जग हे एकच कुटुंब समजण्याची शिकवण देतो. याच संदर्भात त्यांनी जी 20 ची संकल्पना, “ एक देश, एक कुटुंब, एक भविष्य” ला स्पर्श करत भारताचा निरोगी जीवनाचा दृष्टिकोनही ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ असा आहे, असे मोदी म्हणाले. भारताचा दृष्टिकोन केवळ मानवापर्यंत मर्यादित नाही, तर त्यात संपूर्ण परिसंस्था, म्हणजे प्राणिमात्र, वनस्पती आणि पर्यावरण यांचाही समावेश होतो, यावर मोदी यांनी भर दिला. जेव्हा संपूर्ण परिसंस्था निरोगी असेल, तेव्हाच, आपणही निरोगी राहू शकतो, असे ते म्हणाले.

आरोग्यक्षेत्राची उपलब्धता, सर्वांना समान सेवा परवडणाऱ्या दरात मिळण्याबाबत भारताच्या उपलब्धी त्यांनी अधोरेखित केल्या. त्या संदर्भात, -आयुष्मान भारत, या जगातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा सुविधेचे त्यांनी उदाहरण दिले. या योजनेअंतर्गत व्यापक प्रमाणात आरोग्य विमा सुविधा देण्यात आला आहे, तसेच, लक्षावधी लोकांपर्यंत स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा पोहोचवण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

भारताचे अनेक प्रयत्न, देशातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचवून, त्यांना सुदृढ करण्याचा दृष्टिकोन पूर्ण करण्याच्या देण्याच्या उद्देशाने आहेत हे अधोरेखित करत, भारतासारख्या प्रचंड विविधता असलेल्या देशात जो दृष्टिकोन यशस्वी होऊ शकतो, तो इतर देशांसाठी सुद्धा मार्गदर्शक आराखडा ठरू शकतो, असे पंतप्रधानांनी सुचवले. अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये अशाच प्रकारच्या प्रयत्नांसाठी जागतिक आरोग्य संघटनेला पाठिंबा देण्यास भारत उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी सर्वांसाठी आरोग्याच्या उद्दिष्टासाठी 75 वर्षे केलेल्या प्रयत्नांबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे कौतुक केले. भविष्यात समोर उभ्या असलेल्या आव्हानांसाठी WHO सारख्या जागतिक संस्थांची भूमिका अधिक महत्त्वाची असेल, असेही ते म्हणाले. “एक निरोगी जग निर्माण करण्यासाठी भारत प्रत्येक प्रयत्नांना मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे”, असे शेवटी पंतप्रधानांनी सांगितले.