जोपर्यंत कोरोनाचे औषध नाही, तोपर्यंत अजिबात कुचराई नाही-पंतप्रधान मोदी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद

नमस्‍कार मित्रांनो,

एका दीर्घ काळानंतर आज आपल्या सगळ्यांची भेट होत आहे. आपण सगळे ठीक आहात ना? काही संकट तर नाही आले ना आपल्या कुटुंबात? चला, परमेश्वर आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवो.

एका विशिष्ट वातावरणात संसदेचे हे अधिवेशन आज सुरु होत आहे. कोरोनाही पण त्याचवेळी कर्तव्येही आहेत. आणि सर्व खासदारांनी कर्तव्याचा मार्ग निवडला आहे. मी सर्व खासदारांचे, त्यांच्या या पुढाकारासाठी अभिनंदन करतो, आणि त्यांना धन्यवादही देतो.

अर्थसंकल्पीय अधिवेशन नियोजित वेळेआधीच थांबवावे लागले होते. यावेळीही दिवसांतून दोनदा, एकदा राज्यसभा, एकदा लोकसभा अशी वेळही बदलावी लागली आहे. यावेळी शनिवार-रविवारची सुट्टी देखील रद्द करण्यात आली आहे. मात्र सर्व सदस्यांनी ही बाब मान्य केली आहे, त्याचे स्वागत केले आहे आणि कर्त्यव्याच्या मार्गावर पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

या अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय होण्याची अपेक्षा आहे, अनेक विषयांवर चर्चा होईल आणि आपल्या सर्वांचा अनुभव आहे की लोकसभेत जितकी जास्त सविस्तर चर्चा होते, जितकी वैविध्यपूर्ण चर्चा होते, तितका सभागृहाला, सबंधित विषयाला त्याचा अधिक लाभ होतो, पर्यायाने देशालाही त्याचा फायदा होतो.

यावेळीही संसदेच्या या महान परंपरेत आम्ही सर्व खासदार मिळून मूल्यवर्धन करु, असा मला विश्वास वाटतो. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ज्या ज्या गोष्टींसाठी सतर्क आणि दक्ष राहण्याची गरज आहे, त्या सर्व सूचनांचे आपल्याला पूर्ण पालन करायचेच आहे. आणि हे ही स्पष्ट आहे  की-जोपर्यंत औषध नाही, तोपर्यंत अजिबात कुचराई नाही. आमची इच्छा आहे, की  लवकरात लवकर जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात याची लस उपलब्ध व्हावी, आपले शास्त्रज्ञ यात लवकरात लवकर  यशस्वी व्हावेत आणि जगातल्या प्रत्येकाला या संकटातून बाहेर काढण्यात आपल्याला यश मिळो.

या सभागृहाची आणखी एक मोठी जबाबदारी आहे आणि विशेषत: या अधिवेशनाची अधिक जबाबदारी आहे. आज आपल्या सैन्यातील वीर जवान सीमेवर पाय रोवून उभे आहेत. मोठ्या हिमतीने, एक दुर्दम्य विश्वास, दृढनिश्चय मनात घेऊन ते अत्यंत दुर्गम पर्वतांमध्ये चिकाटीने उभे आहेत, आणि काही काळाने तिकडे पाऊसही सुरु होईल. ज्या विश्वासाने ते उभे आहेत, मातृभूमीच्या रक्षणासाठी उभे आहेत, त्यांना या सभागृहाकडून सभागृहातील सर्व सदस्यांनी एका स्वरात एका भावनेने. एका संकल्पातून आपण त्यांना संदेश देऊ- सेनेच्या या वीर जवानांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे, संसद आणि सर्व संसद सदस्यांच्या माध्यमातून उभा आहे. मी तुम्हालाही आग्रहाने सांगेन की आधीप्रमाणे तुम्हालाही आता सर्व ठिकाणी मुक्तपणे फिरता येणार नाही, मात्र आपल्या स्वतःची काळजी घ्या. आपल्या स्वतःची नीट काळजी घ्या मित्रांनो. बातम्या तर मिळतील, ते काही तुमच्यासाठी कठीण काम नाही. मात्र स्वतःला नक्की संभाळा मित्रांनो, ही माझी तुम्हाला वैयक्तिक प्रार्थना आहे.

धन्यवाद मित्रांनो!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *