कोरोनाशी भारताचा लढा म्हणजे आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेचे द्योतक : पंतप्रधान

  • कोविड -19 लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ
  • इतक्या व्यापक स्तरावरचे लसीकरण जगाने अद्याप पाहिले नसल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
  • कोरोनासंदर्भात भारताच्या प्रतिसादाची जागतिक स्तरावर दखल : पंतप्रधान
  • आघाडीच्या कोरोना योद्ध्यांप्रती अर्पण केली आदरांजली

नवी दिल्ली, 16 जानेवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा दूरदृष्य प्रणाली द्वारे प्रारंभ केला. यावेळी  सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातली  एकूण  3006 केंद्रे दूरदृश्य प्रणालीद्वारे जोडण्यात आली होती.  

 संपूर्ण देशभरात राबवली  जात असलेली ही मोहीम म्हणजे जगातला सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम आहे.

लस विकसित करण्याच्या कार्यात योगदान देणाऱ्या संशोधकांची प्रशंसा करत पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाची  सुरवात केली. साधारणपणे लस तयार करण्यासाठी वर्षांचा काळ लागतो मात्र इथे अगदी कमी कालावधीत एक नव्हे तर दोन मेड इन इंडिया अर्थात भारतात उत्पादित लसी तयार झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. लसीचे दोन डोस  अर्थात मात्रा चुकवता कामा नये असे सांगून दोन डोस घेण्याबाबत दक्ष राहण्याची सूचना त्यांनी केली.दोन डोसमध्ये एक महिन्याचे अंतर राहणार आहे.दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यानंतर मानवी शरीरात कोरोना प्रतिबंधक क्षमता विकसित होणार असल्याने  लस घेतल्यानंतरही खबरदारीच्या आधी सुरु असलेल्या उपाययोजना जारी ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

या मोहिमेच्या पहिल्या टप्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाणार असून जगभरातल्या सुमारे 100 देशांच्या लोकसंख्येपेक्षा ही संख्या जास्त आहे असे सांगून त्यांनी या मोहिमेच्या अभूतपूर्व व्यापकतेची कल्पना  दिली.  ही संख्या दुसऱ्या टप्यात 30 कोटी पर्यंत न्यायची असून यामध्ये वयस्कर आणि गंभीर  बहु व्याधी असलेल्या लोकांना लस दिली जाणार आहे. 30 कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले भारत, अमेरिका आणि चीन हे तीनच  देश असल्याचे त्यांनी सांगितले.

 लसीबाबत अफवा आणि अपप्रचाराला थारा देऊ नका असे आवाहन करत भारतीय लस वैज्ञानिक, वैद्यकीय व्यवस्था,प्रक्रिया आणि संस्थात्मक यंत्रणा जागतिक स्तरावर विश्वासार्ह असून सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर ही विश्वासार्हता कमावली असल्याचे ते म्हणाले.

कोरोना विरोधात एकजुटीने आणि खंबीरपणे दिलेल्या लढ्याबद्दल त्यांनी देशाची प्रशंसा केली. हा लढा म्हणजे आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेचे द्योतक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आत्मविश्वास डळमळीत होऊ द्यायचा नाही हा निर्धार प्रत्येक भारतीयात असल्याची प्रचीती आल्याचे   ते म्हणाले. इतरांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात  घालत डॉक्टर, परिचारिका, निम वैद्यकीय कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, आशा कर्मचारी,सफाई कर्मचारी,पोलीस आणि आघाडीवर राहून काम करणाऱ्या सर्वांच्या योगदानाची त्यांनी तपशीलवार दखल घेतली. यातल्या काही जणांनी कोरोना विरोधातल्या लढ्यात आपले प्राण गमावल्याने ते घरी कधीच परतले नाहीत असेही त्यांनी सांगितले.निराशा आणि भीती यांनी घेरलेल्या त्या काळात आघाडीच्या योद्ध्यांनी आशेचा मार्ग दाखवला, आज त्यांना प्रथम लस देऊन देश त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करत असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

संकटाच्या सुरवातीच्या काळाचे स्मरण करत भारताने सतर्कता दाखवत योग्य वेळी योग्य निर्णय घेतले असे ते म्हणाले. 30 जानेवारी 2020 ला पहिला रुग्ण आढळण्यापूर्वी दोन आठवडे आधीच  भारताने उच्च स्तरीय समिती स्थापन केली होती. आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी भारताने यासंदर्भात योग्य लक्ष ठेवण्यासाठी सुरवात केल्याचे त्यांनी सांगितले.17 जानेवारी 2020 ला भारताने पहिली मार्गदर्शक सूचनावली जारी केली असे सांगून विमानतळावर प्रवाश्यांचे स्क्रीनिग सुरु करणाऱ्या  पहिल्या देशांमध्ये भारत होता असे त्यांनी सांगितले. 

जनता कर्फ्यूच्या काळात शिस्त आणि संयमाचे आव्हान पार केल्याबद्दल त्यांनी देशवासीयांचे अभिनंदन केले. यामुळे देशवासीयांची लॉकडाऊनसाठी मानसिकता तयार झाली याकडे त्यांनी लक्ष वेधले. टाळी- थाळी, दीप उजळणे यासारख्या कृती मुळे  देशाचे मनोधैर्य उच्च राहिल्याचे पंतप्रधान म्हणाले.

परदेशात अडकलेल्या भारतीयांना देशात परत आणण्याच्या अभियानाचाही त्यांनी उल्लेख केला. अनेक देशांनी त्यावेळी  चीन मध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना तसेच सोडले होते अशा काळात भारताने केवळ भारतीयच नव्हे तर इतर देशाच्या नागरिकांचीही सुटका केली.

कोरोनासंदर्भात भारताच्या प्रतिसादाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली. केंद्र, राज्ये, स्थानिक प्रशासन, सरकारी कार्यालये, सामाजिक संघटना,या सर्वांनी  एकमुखाने  प्रभावी पणे काम केले असे सांगून समन्वित आणि एकत्रित प्रतिसादाचे हे उदाहरण असल्याचे ते म्हणाले.

भारताने जगातल्या #LargestVaccineDrive सर्वात मोठ्या लसीकरण अभियानाला सुरवात केल्याचे ट्वीट पंतप्रधानांनी यानंतर केले. हा अभिमानाचा दिवस असून वैद्यकीय समूह, परिचारिका, पोलीस, सफाई कर्मचारी यांचे परिश्रम, आपल्या वैज्ञानिकांचे कौशल्य साजरा करण्याचा दिवस असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रत्येकाला उत्तम आरोग्य लाभो आणि आजारापासून मुक्ती लाभो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण विश्वात आरोग्य,आनंद नांदो आणि  जग दुःखमुक्त राहो अशी भावना व्यक्त करणारी प्रार्थना त्यांनी केली-   

सर्वेभवन्तुसुखिनःसर्वेसन्तुनिरामया।

सर्वेभद्राणिपश्यन्तुमाकश्चित्दुःखभाग्भवेत्।।