हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष दूर व्हावा यासाठी सकारात्मक कार्यवाही करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई ​,२१  एप्रिल / प्रतिनिधी :- “हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करावी,” असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाला दिले. जिल्ह्याला पाणी मिळणे महत्त्वाचे असून त्या दिशेने प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली.

हिंगोली जिल्हा अनुशेष निर्मूलनाबाबत आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस आमदार संतोष बांगर, माजी खासदार शिवाजी माने, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत असणाऱ्या विविध प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण होणे आवश्यक आहेत. यासंदर्भात ज्या तांत्रिक बाबी पूर्ण करणे अपेक्षित आहेत, त्यांची पूर्तता करावी. हिंगोली जिल्ह्यास पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे.

बंधारे बांधण्यासाठी मापदंड शिथिल करावेत, उच्च पातळीचे बंधारे बांधण्यास तत्वतः मंजूरी द्यावी, साफळी धरणाचे शिल्लक पाणी हिंगोली जिल्ह्याच्या सिंचनासाठी मिळावे आदी बाबी आमदार श्री.बांगर आणि श्री. माने यांनी मांडल्या. त्यावर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले की, तांत्रिक बाबीसंदर्भात जलसंपदा विभाग निर्णय घेईल. बंधाऱ्यांचे बॅरेजस मध्ये रुपांतर करण्याचे धोरणही लवकरच निश्चित करण्यात येत आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.