माहिती विभागाच्या पदभरतीत पदव्युत्तर पदवी, पदविकाधारकांना संधी मिळणार

मुंबई,२१  एप्रिल / प्रतिनिधी :-  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या पदभरतीत पत्रकारिता पदव्युत्तर पदवी आणि  पदव्युत्तर पदविकाधारकांना संधी मिळणार आहे. नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शुद्धीपत्रक जारी करुन शैक्षणिक अर्हतेत पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका समाविष्ठ केल्या आहेत.

महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील उपसंचालक (माहिती), वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)/जिल्हा माहिती अधिकारी/वरिष्ठ उपसंपादक/जनसंपर्क अधिकारी आणि सहायक संचालक (माहिती)/अधिपरिक्षक पुस्तके व प्रकाशने/माहिती अधिकारी या संवर्गातील पदभरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीला अनुसरुन शैक्षणिक अर्हतेच्या अनुषंगाने माहिती विभागाकडून पत्रकारिता पदविका आणि पदवीसह आता पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविकाही समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येणार आहे. अर्हता प्राप्त उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत असून अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याप्रमाणे अर्ज सादर करण्याचा आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ८ मे २०२३ रोजी रात्रीपर्यंत आहे. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची तारीख १० मे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ११ मे रोजीपर्यंत आहे.

या जाहिरातीस अनुसरुन विहित पद्धतीने यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. या पदभरतीसंदर्भातील मूळ जाहिरात व शुद्धीपत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.