सरकारने महाराष्ट्राला फक्त सुडाचे राजकारण दिले-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील

नागपूर,१७ एप्रिल  / प्रतिनिधी :-विदर्भाच्या शेतकऱ्यांची ही वज्रभूठ आहे. ही वज्रमूठ या सरकारला विचारते की मागच्या दहा महिन्यात तुम्ही काय दिवे लावलेत? महाराष्ट्रातील व खासकरून विदर्भातील जनतेला या सरकारने दिले काय? या सरकारने कोणते नवे प्रकल्प विदर्भात आणले तसेच विदर्भासाठी कोणते निर्णय या सरकारने घेतले? या सरकारने महाराष्ट्राला फक्त सुडाचे राजकारण दिले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील केली.

नागपूर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पाडली.या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्य जयंतराव पाटील यांनी संबोधित केले. आज महाविकास आघाडीच्या वज्रमूठची दुसरी सभा ही नागपूरात होत आहे. नागपूर हा भारताचा केंद्र बिंदू आहे. क्रांतिकारकांची भूमी आहे. जेव्हा जेव्हा आम्ही नागपूरमध्ये एकत्र येतो. नागपूरमध्ये जेव्हा ठरतं तेव्हा त्याचा संदेश देशभर जातो. नागपूर-विदर्भाने पाठिंबा देयचे ठरवले तर या वैदर्भीय भूमीतून आलेला पाठिंबा इंदिरा गांधी यांना देखील महासत्तेवर पोहोचवण्यासाठी याच विदर्भाने एका सूरात पाठिंबा दिला आहे हे आपल्याला कधी विसरता येणार नाही. विदर्भाने निर्णय केला तर हा निर्णय देशात पोहचतो. त्यामुळे आजच्या सभेला आमच्या सर्वांच्या दृष्टीने फार महत्त्व आहे.

विदर्भाच्या शेतकऱ्यांची ही वज्रभूठ आहे. ही वज्रमूठ या सरकारला विचारते की मागच्या दहा महिन्यात तुम्ही काय दिवे लावलेत? महाराष्ट्रातील व खासकरून विदर्भातील जनतेला या सरकारने दिले काय? या सरकारने कोणते नवे प्रकल्प विदर्भात आणले तसेच विदर्भासाठी कोणते निर्णय या सरकारने घेतले? या सरकारने महाराष्ट्राला फक्त सुडाचे राजकारण दिले, अशी टीका प्रदेशाध्यांनी केली. आपल्या बरोबर जे आले नाही त्यांना संपवण्याचे सुडाचे राजकारण गेल्या वर्षभरात सुरू आहे. हे सरकार सत्तेवर येताच माजी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील सर्व कामांना स्थगिती देण्याचे काम केले. कोर्टाने ऑर्डर देऊन देखील कामांवर स्थगिती अजून उठवण्यात आली नाही. राज्यातील तरुणांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या सरकारने केले. आपल्या राज्यातील उद्योग शेजारच्या राज्यात गेले. त्या उद्योपतींना साधं भेटण्याचे धाडसंही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केले नाही.. तसं केले तर शेजारच्या राज्यातले मालक नाराज होऊन आपली खुर्ची धोक्यात येईल अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची होती, अशी टिपणी जयंतराव पाटील यांनी केली.

५० खोक्यांचे विडंबन करून जे तरुण सत्य परिस्थिती मांडत आहेत. त्यांना तुरुंगात डांबण्याचे काम हे सरकार करत आहे. आपल्या विरोधात बोलेल त्याला नोटीस देयची, त्याला सर्व प्रकारचा त्रास देयचा या पलीकडे या सरकारने काही काम केले आहे असं मला दिसत नाही. मागील काळात माजी राज्यपालांनी महाराष्ट्राच्या महापुरुषांचा वारंवार अपमान केला. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आले की हे सरकार बहुजनांचे सरकार नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र निवडणुकांची वाट बघत आहे. परंतु आता सरकार देखील निवडणुका घेईना झाले आहे. हा जो अथांग भरलेला जनसागर आहे याची सरकारला धडकी भरलेली आहे. महाराष्ट्र सरकारला जर आपण लोकप्रिय वाटतं असेल तर त्यांनी मुंबई महापालिका पासून ते सर्व निवडणुका घेऊन दाखव्यावात, असे थेट आव्हान जयंतराव पाटील यांनी केले.

परंतु हे सरकार निवडणुकाला घाबरत आहे. या सरकारला लोकांपुढे जाण्याची भीती आहे. त्यामुळे आता इव्हेंट करण्याचं कार्यक्रम घ्यावे लागतात अलीकडच्या काळात आपण सर्व बघतोय. महाराष्ट्रातील जनता ही महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मा. मनमोहन सिंग यांना १० वर्षे मिळाले त्याकाळात भारताच्या प्रगतीचा आलेख वाढलेला होता. परंतु मागील नऊ वर्षात जागतिक पत्रकार स्वातंत्र्य निर्देशांक भारताचा क्रमांक १५० व्या स्थानावर, जागतिक आनंद निर्देशांकात भारत १३६ व्या क्रमांकावर, स्त्री-पुरुष समानतामध्ये भारत १३५ व्या क्रमांकावर, मानवविकास निर्देशांकात भारत १३२ व्या क्रमांकावर आहोत. मग आपण विश्वगुरू कसे होणार? आपल्या देशाचा क्रमांक थोडाथोडा तरी वर येयला हवा पण या काळात आमची अधोगती झाली आहे, अशी टीका जयंतराव पाटील यांनी केली. या देशात विरोधकांना शत्रू मानण्याची पद्धत नव्हती. पण दुर्दैवाने ही पद्धत सुरू झाली आहे. माझ्या सारख्या कार्यकर्त्याला वाटते की आपण सर्वांनी मिळून ही वज्रमूठ एकत्रित केली पाहिजे. महाराष्ट्राला एकसंध राहण्यासाठी ही वज्रमूठ आहे. ही वज्रमूठ एक झाली तर ही सत्ता आपल्याला पुन्हा दिसणार नाही. ही भीती सत्तेत असलेल्या लोकांना आहे. त्यामुळे ही वज्रमूठ पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या सर्व भागात जाणार आहे. सर्व जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.

या सभेला माजी गृहमंत्री संबोधित करताना म्हणाले, अवकाळी पावसामुळे विदर्भातील संत्री व मोसंबींचे मोठे नुकसाना झाले. त्याची नुकसान भरपाई शेककऱ्यांना अद्याप मिळाली नाही. मराठवाड्यात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. आज कापूस उत्पादक अडचणीत आहे. मोठ्या प्रमाणात कापसाची आयात भारतात करण्यात आली. त्यामुळे कापसाचे भाव पडले. ११ टक्के आयातकर रद्द केला तसेच कापसाची निर्यात परदेशात केली नाही. त्यामुळेही कापसाला भाव मिळाला नाही. कापूस उत्पादक मोठ्या अडचणीत आहे. परंतु याकडे राज्य सरकार व केंद्र सरकार लक्ष देयला तयार नाहीत. अनेक बँकांकडून शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. परंतु कर्जाची परत फेड करू न शकले त्यांच्या शेतीचा लिलाव करण्याचे काम या सरकारने सुरू केले आहे, अशी विदर्भातील शेतकऱ्यांची सत्य परिस्थिती अनिल देशमुख यांनी मांडली.

बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. महाराष्ट्रता वेदांत, फॉक्सकॉन सारखे मोठे प्रकल्प येणार होते. त्यामुळे राज्यातील तरुणांना नोकरी मिळाली असती मात्र ते प्रकल्प राज्याबाहेर गेले. एअर बस, साफ्रॉन हे प्रकल्प नागपूर मिहानमध्ये येणार होते ते सुद्धा आले नाही. अशा प्रकारचे राज्य सरकारचे काम सुरू आहे. या सर्व गोष्टींचा विचार महाराष्ट्राच्या जनतेने केला पाहिजे, असे आवाहन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

सभेला गर्दी बघून वारं कोणत्या दिशेला वाहते हे महाराष्ट्राला कळल्याशिवाय राहणार नाही. एकदंर विदर्भाचा राजकीय इतिहास बघितल तर विदर्भात जातीयवाद्यांना थारा कमी मिळाला आहे. काँग्रेसी विचार, धर्मनिरपेक्ष विचार हे विदर्भाने कायम टिकवून ठेवले हे विदर्भाचे मोठेपण आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काढला.

हा देश गांधीजींसमोर नतमस्तक होतो. एनसीईआरटीमधून मुघलांचा इतिहास काढला. गांधीजींचा सगळा इतिहास गायब करून टाकला. गांधीजींचा इतिहास कळूचं नये याच पूर्ण प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. गांधीजींना वारंवार मारले जाते पण गांधी कधी संपत नाही. ते विचारांतून जीवंत आहेत. आम्ही गांधीजींच्या विचारांवर चालणारे लोक आहोत. सहा महिन्यापूर्वी या महाराष्ट्रात जी राजकीय संस्कृती होती त्या राजकीय संस्कृतीची अंत्ययात्रा काढण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विरोधी पक्षांची वैमनस्य हे विचारांचे असावे पण आज व्यक्तिगत वैमनस्य काढले जात आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली.

जिथे जिथे जातात तेथे केवळ घोषणा केल्या जातात. मुख्यमंत्री तर सहा महिन्यापूर्वी आम्ही काय केले याचे गुणगान गातात. सहा महिन्यापूर्वी खंजीर काढून तुम्ही गद्दारी केली होती. या गद्दारीचे उत्तर हे महाराष्ट्र वाट बघत आहे. मतदान कधी होते. मतपेट्या कधी उघडतात मग कळेल महाराष्ट्राच्या मनात काय सुरू आहे, असा इशारा आव्हाड यांनी राज्य सरकारला दिला.

ओबीसी जनसंख्या मोजण्याचे काम हे सरकार करू इच्छित नाही हे दुर्दैव आहे. बहुजनांवर अन्याय करण्याचे काम हे सरकार करत आहे. हे बहुजनांच्या लक्षात आले पाहिजे. दंगली या येथे ठरवून केल्या जातात. हिंदू-मुस्लिम शांत असताना जाणीवपूर्वक सामाजिक ऐक्य बिघवण्याचे काम केले जात आहे. कारण भाजपा- शिंदे गटाचे सरकारला फार काही जागा मिळणार नाही असे रिपोर्ट येतात. त्यामुळे अशा प्रकारच्या दंगली घडवण्याचे काम सुरू आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. बहुजन समाजाने एक झाले पाहिजे. बहुजन समाजाच्या अस्तित्वासाठी एकत्रित येऊन लढूया व आपण सर्वांनी एक होऊन महाविकास आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले .