उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाकयुद्ध 

देवेंद्र फडणवीस हे फडतूस गृहमंत्री:आता यांना गुंडमंत्री म्हणायचं का?-उद्धव ठाकरे

ठाणे ​,४ एप्रिल / प्रतिनिधी :- “ठाण्याची ओळख म्हणजे महिलांचे संरक्षण ठाणे अशी होती पण आता गुंडगिरीची ठाणे अशी ओळख होऊ लागली आहे. आता यांना गुंडमंत्री म्हणायचं का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच, “देवेंद्र फडणवीस हे फडतूस गृहमंत्री. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.” अशी टीका त्यांनी यावेळी केली. “उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांचा लाळघोटेपणा सुरु आहे. फडणवीसांमध्ये हिमंत असेल तर आयुक्तांवर कारवाई करा,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, “जर शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर आता या क्षणाला यांची ठाण्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून गुंडगिरी मुळासकट उपटून फेकून देऊ शकतो. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहीलेली नाही. मिंधे गटाची गुंडगिरी वाढत चालली आहे. देवेंद्र फडणवीसांना हे झेपत नसेल तर त्यांनी जनतेशी प्रामाणिक राहून पदभार सोडावा.” अशी टीका त्यांनी केली आहे. दरम्यान, आज ठाण्यातील संपदा रुग्णालयात जाऊन उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी रोशनी शिंदेची भेट घेतली. 

जीभ घसरलेल्या उद्धव ठाकरेंनी संयमाने बोलावे:देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सज्जड दम

मुंबई : अडीच वर्षांमधील त्यांचा काराभार पाहिल्यानंतर नेमके फडतूस कोण, हे जनतेला आणि तमाम महाराष्ट्राला माहित आहे, आम्ही तोंड उघडले तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार ठाण्यात जाऊन रोशनीची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असताना उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली. राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय आणि त्यांनी राजीनामा द्यावा, असे ठाकरे म्हणाले. मात्र फडणवीसांनीही त्वरित त्यावर प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंनी संयमाने बोलावे, असे सुनावले आहे.

फडणवीस म्हणाले, दोन मंत्री जेलमध्ये गेले. जेलमध्ये गेल्यानंतरही त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत जे मुख्यमंत्री दाखवत नाही, जे गृहमंत्री वाझेच्या मागे लाळ घोटतात, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. अडीच वर्षे घरात बसून फेसबूकवरून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये. आम्ही तोंड उघडले तर त्यांना पळता भुई होईल. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. मला तुमच्यापेक्षा खालच्या भाषेत बोलता येते कारण मी नागपूरचा आहे. पण मी तसे बोलणार नाही. हा त्यांचा थयथयाट आहे, याला उत्तर देण्याचे कारण नाही.

विरोधक राजाविरोधात बोलतात तेव्हा समजावं राजा योग्य आहे. मी गृहमंत्री पद सोडण्याची वाट बघत आहेत. पण मी गृहमंत्रीपद सोडणार नाही. चुकीचे काम करणाऱ्या व्यक्तीला तुरुंगात पाठवणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

”माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारचा अडीच वर्षांचा कारभार राज्याने पाहिला आहे. त्यामुळे नेमकं फडतूस कोण आहे हे महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे माहित आहे. तुमच्या काळात दोन मंत्री कारागृहात जाऊनही त्यांचा राजीनामा न घेता त्यांची लाळ घोटणाऱ्यांना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. ज्यांच्या काळात पोलीस खंडणी वसूल करायचे आणि तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांची पाठराखण करायचे हे महाराष्ट्राने पहिले आहे. त्यामुळे गुन्हेगारांची आणि खंडणीखोर वाझेची लाळ घोटणाऱ्यांना माझ्यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खडसावले आहे.

माझ्या गृहमंत्री पदामुळे अनेकांचे देव पाण्यात !

”मी पाच वर्षे या राज्याचा गृहमंत्री राहिलेलो आहे आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्येही गृहमंत्रालय सांभाळत आहे. मी राज्याचा गृहमंत्री असल्यामुळे अनेकांची अडचण होत आहे हे मला माहित आहे. माझे गृहमंत्री पद कधी जाईल यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले असले तरी हे गृहमंत्री पद मला तुमच्यामुळे मेहरबानीने मिळालेले नसल्याने ते मी सोडणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. जी मंडळी या राज्यात चुकीच्या गोष्टी करतील त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय मी राहणार नाही,” असा गर्भित इशारा फडणवीसांनी महाविकास आघाडीला दिला आहे.