ठाण्यात ठाकरे गटाच्या महिलेला मारहाण; ठाकरे – शिंदे गटाच्या वादाची मुख्यमंत्र्यांकडूनही दखल

मुंबई,४ एप्रिल / प्रतिनिधी :- घोडबंदर रोडवरील कासारवडवली परिसरात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना काही शिंदे गटाच्या महिलांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फेसबुक पोस्टवरून हा वाद झाल्याचे समोर आले आहे. परंतु, याचे चांगलेच पडसाद आता राज्यातील राजकारणात दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रोशनी शिंदे या गर्भवती असून त्यांना काही शिंदे गटाच्या महिलांनी मारहाण केली. याप्रकरणी अजूनही गुन्हा दाखल न झाल्याने ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात आनंद आश्रमामध्ये पोलिसांसोबत बैठक घेतल्याची माहिती देण्यात येत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या रुग्णालयात दाखल असलेल्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ठाण्यामध्ये घडलेल्या या घटनेमुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे या संध्याकाळी ऑफिसमधून घरी जाण्यास निघाल्या होत्या. यावेळी त्यांच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये शिरुन त्यांना शिवसेनेच्या शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. यादर्भात पोलिसांनी कोणतीही तक्रार दाखल केली नसून वैद्यकीय अहवाल समोर आल्यानंतर पुढची कारवाई करू असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, ‘आरोपींना त्वरित अटक करा नाहीतर खुर्च्या खाली करा’, ‘भगिनींना न्याय मिळालाच पाहिजे’ अशा प्रकारच्या घोषणा देत कासारवडवली पोलीस स्थानकाबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.

महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न; शिंदे गटाचा आरोप

ठाणे ​,४  एप्रिल / प्रतिनिधी :- शिंदे आणि ठाकरे गटामधील राड्यानंतर आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना २० ते २५ शिंदे गटाच्या महिलांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर रोशनी शिंदे यांना आधी सिव्हिल रुग्णालयात नंतर संपदा या खासगी रुग्णालयात दखल करण्यात आले. आधी मुख्यमंत्री शिंदेनी पोलिसांची बैठक घेऊन २ तास चर्चा केली. तर ठाकरे कुटुंबाने रोशनी शिंदे यांची भेट घेत शिंदे – फडणवीस सरकरवर सडकून टीका केली. दरम्यान, शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत मारहाण झालीच नसल्याचा दावा केला.

शिंदे गटाच्या पदाधिकारी मीनाक्षी शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, “महिल्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बदनामी करण्याचे हे षडयंत्र आहे. आम्ही रोशनी शिंदेला कोणतीही मारहाण केली नाही. फेसवुकवर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली. यावरून तिला समजावयाला गेल्यानंतर तिने उलटसुलट बोलण्यास सुरुवात केली आणि यामध्ये थोडी धक्काबुक्की झाली. पण, तिला कोणतीही मारहाण आम्ही केलेली नाही. तरीही असे खोटे आरोप करणाऱ्यावर कारवाई करावी लागेल.” असा दावा त्यांनी यावेळी केला आहे.

पुढे त्यांनी खासदार राजन विचारे यांच्यावरही गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, “गेल्या वर्षभरात शिंदे गटाच्या लोकांनी एकही आक्षेपार्ह पोस्ट केलेली नाही. पण इकडच्या खासदारांनी एक टीम बसवली असून त्यातून आक्षेपार्ह विधाने तयार करून फेसबुकवर टाकायला लावायची त्यांची सिस्टीम सुरु आहे. त्याला आम्ही आजपर्यंत प्रत्युत्तर दिलेले नाही. पण आता डोक्याच्या वर जाते आहे. माझे खासदारांना आव्हान आहे, तुमच्यामध्ये थोडा जरी पुरुषार्थ शिल्लक असेल, तर तुम्ही स्वत: रस्त्यावर उतरा. एका मुलीच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत बसणार असाल तर याचा निषेध ठाण्याची महिला आघाडी करत राहणार आहे.”

ठाण्यातील मारहाण प्रकरणातील रोशनी शिंदेंबद्दल काय म्हणाले डॉक्टर?

ठाणे ​,४  एप्रिल / प्रतिनिधी :-आज ठाण्यामधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कासारवडवली परिसरात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना काही शिंदे गटाच्या महिलांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. त्यांना ठाण्यातील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी त्या गर्भवती असल्याची माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आली होती. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. उमेश आळेगावकर यांनी पत्रकारांना तिच्या स्वास्थ्याबद्दल माहिती दिली.

रोशनी शिंदेंवर उपचार करणारे डॉ. उमेश आळेगावकर म्हणाले की, “रोशनी शिंदेच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत, किंवा कुठलीही गंभीर मारहाण झालेली नाही.” असे स्पष्ट केले. ते म्हणाले, “काल रात्री १०.३० वाजता रोशनी शिंदे सिव्हील रुग्णालयामधून खासगी संपदा रुग्णालयामध्ये दाखल झाल्या. त्यांना गंभीर मारहाण झालेली नाही. त्यांच्या पाठीवर मुक्या माराच्या हलक्या खुणा आढळल्या आहेत. तसंच सोनोग्राफी केल्यानंतर कोणतीही अंतर्गत जखम, रक्तस्राव आढळून आला नाही. त्याचप्रमाणे तिची युरिनल प्रेंग्नसी चाचणी करण्यात आली. तीही निगेटीव्ह आली.” अशी माहिती त्यांनी दिली. यामुळे, ‘सध्यातरी रोशनी शिंदे या गर्भवती नाहीत,’ असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.