बांबूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन  तसेच संशोधन करून दर्जेदार किफायतशीर उत्‍पादने तयार केल्यास बांबूची अर्थव्यवस्था उभी राहील-केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास

नागपूर,१७ एप्रिल  / प्रतिनिधी :-बांबूवर विविध प्रयोग होत आहे. पण त्याला हवी तशी  बाजारपेठ  उपलब्‍ध होत नाही. बांबूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्यास, सामान्‍यांच्‍या उपयोगासाठी त्‍यात संशोधन करून दर्जेदार किफायतशीर उत्‍पादने तयार केली तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, ग्रामीण आणि आदिवासींसाठी ते लाभदायी ठरेल आणि  बांबूची अर्थव्यवस्था उभी राहील  असा विश्‍वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी  आज व्‍यक्‍त केला. बांबू सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र चॅप्टर आणि विदर्भ डेव्हलपमेंट अॅन्ड प्रमोशन कमिटी (व्हीबीडीपीसी) च्‍यावतीने बांबू क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य करणा-या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍यासह गणेश वर्मा व डॉ. लाल सिंग या त्र‍िमूर्तींचा सत्‍कार करण्‍यात आला. नागपूरच्या वर्धा रोड स्थित सीएसआयआर नीरीच्या सभागृहात झालेल्‍या या कार्यक्रमाला वनराईचे अध्‍यक्ष डॉ. ग‍िरीश गांधी, महाराष्‍ट्र बांबू विकास मंडळाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्रीनिवास राव  यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती.

बांबूपासून क्रॅश बॅरियरची निर्मिती करणारे गणेश वर्मा यांच्‍या कार्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी  कौतूक केले.  हे बॅरियर वणी – वरोरा रस्त्यावर बसवले आहेत. रस्‍ते अपघातांपासून संरक्षण करणारे हे उत्‍कृष्‍ट दर्जाचे क्रॅश बॅरियर रस्‍त्‍यावर लावण्‍यात आल्याने  अनेक स्‍तरावर अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्‍यासाठी प्रयत्‍न सुरू असून त्‍यासाठी नव्‍याने धोरण तयार तयार करावे लागेल. बांबूचे दर्जात्‍मक क्रॅश बॅरियर तयार करून देणारे  कंत्राटदार  तयार करावे लागतील. गणेश वर्मा यांनी त्‍यासाठीदेखील पुढाकार  घ्यावा, असे नितीन गडकरी यावेळी म्‍हणाले.

बांबूच्‍या विविध जातींची लागवड करण्‍यासाठी ‘बांबू नर्सरी’चे प्रशिक्षण देण्‍याच्‍या कार्यशाळा घेणे, त्‍यासाठी मोठ्या प्रमाणात रोपटे तयार करणे, ते स्‍वस्‍तात लोकांना उपलब्‍ध करून देणे, पडीक जमिनीवर बांबू लावणे यासारखे उपक्रम बांबू सोसायटीने आयोजित केल्‍यास तयार झालेल्‍या बांबूला मार्केट उपलब्‍ध करून देण्‍याची हमी मी घेईल, असे आश्‍वासन नितीन गडकरी यांनी यावेळी दिले.

स्टिलच्या वापराविरूद्ध पर्यावरणपूरक बांबू क्रॅश वापरण्याच्या आणि अपघात कमी करण्यासाठी भारतीय रस्ते नेटवर्कमध्ये त्यांचा अवलंब करण्याच्या कल्पनेला प्रथम प्रोत्साहन देणारे केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांचा बांबू सोसायटी ऑफ इंडियातर्फे सत्‍कार करण्‍यात आला. सोबतच, बांबूला फ्लाय ऍश डम्पवर वाढण्यास सक्षम करणारे, पडीक जमिनीवर बांबू लागवड करणारे नीरीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लाल सिंग आणि छत्तीसगड येथील  औद्योगिक व कृषी व्यवसायीक गणेश वर्मा यांचा नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते सन्‍मान करण्‍यात आला. शाल, श्रीफळ, स्‍मृतिचिन्‍ह व सन्‍मानपत्र असे पुरस्‍काराचे स्‍वरूप होते.