डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य सूर्याच्या तेज्यासारखे तेज ,ऊर्जा, बळ आणि प्रेरणा देणारे- डॉ. श्रीकांत देशमुख 

जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजविणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यांची जयंती.            

छत्रपती संभाजीनगर,१५ एप्रिल / प्रतिनिधी :-  कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.             

यावेळी डॉ. श्रीकांत देशमुख यांनी आपल्या  छोटेखानी मनोगतात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीच्या जीवनपटावर प्रकाश टाकला. 14 एप्रिल ही तारीख उच्चारताच आपल्या अंगामध्ये वेगळेच रोमांच येतात. कारण या पवित्र दिनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर अर्थशास्त्रज्ञ, दलित उद्धारक, कुशल राजकारणी, महान तत्ववेत्ता, मानवतावादी विचारांचे पुरस्कर्ते, चातुरवर्णी व्यवस्थेचा कडाडून विरोध करणारे, दलित वर्गाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. असे ठणकावून सांगणारे,या समाज व्यवस्थेत जे उपेक्षित आहेत. त्या सर्वांना मानवतेची वागणूक मिळाली पाहिजे. यासाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. त्यांचा जन्मदिवस अर्थात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती.  14 एप्रिल रोजी संपूर्ण भारतभर नव्हे तर इतर देशांमध्ये देखील त्यांच्या विचारांचे पाईक या दिवशी मोठ्या उत्साहात साजरी करतात. भारतभूमीला पडलेले सोनेरी स्वप्न म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आपणा सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. जगावं कसं ?अन्यायाविरुद्ध लढावं कसं? संघर्षातून घडावं कसं? वादळासमोर उभं राहावं कसं? आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं? हे डॉ. आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपणालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला दाखवून दिले. त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानी स्वीकारावी लागली. पण यामुळे खचतील ते बाबासाहेब कसले. या संघर्षातून त्यांनी अस्पृश्य आणि दिन दलितांचा उद्धार हेच जीवनाचे ध्येय ठरविले. आपले ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षण हे एक मात्र हत्यार आहे, हे बाबासाहेबांनी फार लवकर ओळखले. ते म्हणायचे “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!” कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे डॉ. श्रीकांत देशमुख यांनी सांगितले.                    

यावेळी कृषी महाविद्यालय संचालक डॉ. दत्तात्रय शेळके, अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. लता काळे, मानव संसाधन अधिकारी श्री. अशोक आहेर, जनसंपर्क अधिकारी श्री. संजय अंबादास पाटील, कार्यालय अधिक्षक श्री. विशवनाथ गव्हाणे आणि विभागप्रमुख आदी उपस्थित होते.