‘बार्टी’ च्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप मंजूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य

बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती तर्फे दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई,१२  एप्रिल / प्रतिनिधी :-   डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने  देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

या मागणी संदर्भात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि  शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याची मागणी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मान्य केली. त्याचे स्वागत करतानाच विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यापुढे फेलोशीपसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात यावी, असा मुद्दाही यावेळी विद्यार्थ्यांनी मांडला.

फेलोशीप मंजूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुढील वर्षापासून बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्यात यावे, असे निर्देश दिले.