होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपये

होर्डिंग कोसळून पिंपरीत ५ जणांचा मृत्यू

मुंबई,१८ एप्रिल / प्रतिनिधी :-   कात्रज-देहू मार्गावरील किवळे येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.

कात्रज-देहू मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळल्याने या  दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तीव्र दुःख तसेच मृत, त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदनाही व्यक्त केली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

पिंपरीत ५ जणांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड:-अवकळी पावसात होर्डिंगच्या आश्रयाला गेलेल्या नागरिकांवर होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेत ५ जण ठार झाल्याची घटना पिंपरी-चिंचवडच्या रावेत किवळे परिसरात घडली. या घटनेत आणखी तिघे जण जखमी झाले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह धुवांधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बचावासाठी काही नागरिकांनी रावेत किवळे येथील मुंबई-पुणे महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवरील पंक्चरच्या दुकानाजवळ होर्डिंगचा आडोसा घेतला. अचानक यावेळी जाहिरातीचे २ मोठे होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे खाली कोसळले होर्डिंग कोसळले. त्याखाली ८ जण अडकले. घटनेनंतर तात्काळ देहूरोड पोलीस आणि रावेत पोलिसांच्या पथकाने स्थानिक नागरिक आणि पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या मदतीने या लोकांना बाहेर काढले. घटनेत ५ जणांचा मृत्यू, तर १ जण जखमी असल्याचे समजते. मृतांमध्ये ४ महिला आणि १ पुरुषाचा समावेश आहे.

घटनेची प्राथमिक चौकशी झाली आणि पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत घटनेसाठी जबाबदार असल्याचा ठपका ठेवत तीन जणांविरुद्ध सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल केले.परवानगी नसतानाही होर्डिंग उभारून त्यावर लावल्या जाणाऱ्या जाहिरातीतून लाखो रुपये कमावले जातात. मात्र, महापालिकेचे अधिकारी अशा बाबीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात आणि त्यांनी केलेलं दुर्लक्षच अशा अपघातांना निमंत्रण देते.