नांदेडमधील शेतकऱ्यांना दिलासा ; अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्यांसाठी ३० कोटी ५२ लाखांचा निधी

नांदेड ,११ एप्रिल/ प्रतिनिधी :- नांदेड जिल्हा व इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी मार्च महिन्यात ४ ते ८ मार्च या कालावधीत तसेच १६ ते १९ मार्च या काळात पडलेल्या अवकाळी पावसामुळे काही शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागले.

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना वेळीच मदतीचा हात पोहचावा, या उद्देशाने तातडीने १७७ कोटी ८० लक्ष ६१ हजार एवढा निधी १० एप्रिल रोजी शासन निर्णय काढून संबंधित विभागांना प्रदान करण्यात आला. यासाठी नांदेड जिल्ह्याला ३० कोटी ५२ लाख १३ हजार एवढा निधी प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना धीर दिला होता. मंत्रालय पातळीवर त्यांनी याबाबत आग्रह धरून नांदेड जिल्ह्यातील बाधितांसाठी ही एक महिन्याच्या आत मदत उपलब्ध करून दिली.

जिल्हा प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पाहणी करून शासनाला वेळीच माहिती उपलब्ध करून दिली होती. लाभार्थ्यांना मदत व मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे.