हसन मुश्रिफांना न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मुंबई,११  एप्रिल / प्रतिनिधी :-  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना मुंबई सत्र न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून त्यांना कधीही अटक होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा केल्याचा आरोप हसन मुश्रिफांवर करण्यात आला होता.

मुंबई सत्र न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाने जामीन अर्जाच्या निकालापर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते, मात्र आता ते संरक्षण संपले आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, नलावडे साखर कारखाना गैरव्यवहार प्रकरणात ईडीने त्यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केली होती. तसेच त्यांच्याशी संबंधित असलेल्या अनेक व्यावसायिकांवर ईडीने छापेमारी केली होती.