केंद्रीय निवडणूक आयोगाचा दणका; राष्ट्रवादी, तृणमुल काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द

नवी दिल्ली,​१०​ एप्रिल  / प्रतिनिधी:- केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. तसेच, ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षांचाही राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय म्हणजे ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांना मोठा दणका मानला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जानेवारी २०००मध्ये राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. पण, २०१४पर्यंत हा दर्जा कायम होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाला नोटिसा पाठवल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, इतर राज्यांमधले अस्तित्व कमी झाल्याने निवडणूक आयोगाने कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमुल काँग्रस हे पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत.तर, दुसरीकडे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.

लोकसभेत किमान चार खासदारांनी त्याचे प्रतिनिधित्व केले पाहिजे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी पक्षांना एकूण मतांपैकी सहा टक्के मतांची आवश्यकता असते. पण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सहा टक्के मते मिळालेले नाहीत असे म्हटले जात आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांची संख्या घटली होती. त्यामुळेच निवडणूक आयोगाकडून ही मोठी कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेसला २०१९ च्या निवडणुकीत कमी जागांवर यश आलं. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. यासह, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही काढून घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे.भारतीय जनता पक्ष ,काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष,नॅशनल पीपल्स पार्टी, आम आदमी पार्टी (आप). आप हा भारतातील सर्वात नवीन राष्ट्रीय पक्ष आहे. या पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली आहे.