शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. नलिनी चौंडेकर-मुळे

छत्रपती संभाजीनगर,३१ मार्च  / प्रतिनिधी :-  शासकीय अध्यापक महाविद्यालय, आय.ए.एस.ई., छत्रपती संभाजीनगरच्या प्राचार्या डॉ. संजिवनी मुळे या ३९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर दि. ३१ मार्च २०२३ रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यांना बी.एड. व एम.एड.च्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत गौरव करून समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. डॉ. संजिवनी मुळे यांनी अनुक्रमे परभणी, नांदेड, अंबाजोगाई व छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयांमध्ये ३९ वर्षे अखंडितपणे अध्यापनाचे कार्य केले. त्यांना सन २०१० मध्ये अंबाजोगाई येथे प्राचार्यपदी पदोन्नती देण्यात आली होती. तर २०१६ मध्ये त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे प्राचार्यपदी पदभार स्वीकारला होता.  

डॉ. नलिनी चौंडेकर-मुळे या प्राचार्या डॉ. संजिवनी मुळे यांच्याकडून प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारताना व्यासपीठावर डावीकडून डॉ. रामेश्वर पद्मे, डॉ. गौतम गायकवाड, डॉ. उर्जित करवंदे, डॉ. नलिनी चौंडेकर-मुळे, डॉ. संजिवनी श्रीकांत मुळे, प्रा. श्रीकांत मुळे, डॉ. शरद निकाळजे, डॉ. भाग्यश्री सुभेदार, ग्रंथपाल श्रीमती वंदना अंभोरे.

उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या आदेशानुसार डॉ. संजिवनी मुळे यांचा प्राचार्य पदाचा पदभार डॉ. नलिनी चौंडेकर-मुळे यांना आज देण्यात आला.  डॉ. नलिनी चौंडेकर-मुळे या सन १९९२ ते १९९७ या काळात फोस्टर डेव्हपमेंट महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे अध्यापनाचे कार्य केले. त्यांची सन १९९७ मध्ये शासकीय सेवेत निवड झाली. त्यांनी परभणी येथील शासकीय अध्यापक महाविद्यालय येथेपण अध्यापनाचे कार्य केले आहे. त्यांना शासकीय सेवेचा सन १९९७ पासूनचा २६ वर्षांचा तर एकूण ३१ वर्षांचा अध्यापनाचे प्रदीर्घ अनुभव आहे. त्या पीएच.डीच्या गाईडपण आहेत व त्यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच अध्यापक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पीएच.डी. प्राप्त केली आहे. 

डॉ. नलिनी चौंडेकर-मुळे यांनी शासकीय अध्यापक महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगरच्या प्राचार्या पदाचा पदभार स्वीकारल्यामुळे सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, बी.एड. व एम.एड.च्या अध्यापक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.

या छोटेखानी कार्यक्रमास त्यांचे पती श्री. बालाजी मुळे, उपाध्यक्ष-मानव संसाधन, लोकमत वृत्तपत्रसमूह यांनादेखील ऐनवेळी आमंत्रित करण्यात आले. यावेळी प्रा. श्रीमती पालोदकर, डॉ. कृतिका चिंचोलीकर, डॉ. सुनिता तोताडे, डॉ. शुभांगी बिदरकर, चव्हाण, दवणे, काकडे, किसवे, घोडके, दत्तात्रय येवले, निलेश आखाडे व आदी उपस्थित होते.